- उज्वल भालेकर
अमरावती - शहरातील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे गुरुवारी एका ५० वर्षीय महिलेवर ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. चार तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमध्ये या महिलेच्या डोक्यातील ७०० ग्रॅमचा ट्यूमर काढण्यात आला आहे. या शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे कर्करोगावरील शस्त्रक्रिया केल्या जात आहे. यामध्ये याठिकाणी अनेक ब्रेन ट्यूमरच्या शस्त्रक्रियादेखील यशस्वी करण्यात आल्या आहेत. मेळघाट येथील नाजो कावळे (वय ५०, रा. कुंथा) या महिलेला काही महिन्यांपासून डोकेदुखीचा त्रास वाढला होतो. याबराेबरच तिच्या डोक्यावर आलेली गाठदेखील वाढत होती आणि तिला होणारा त्रासदेखील वाढला होता. त्यामुळे ती उपचारासाठी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात भरती झाली होती.
याठिकाणी तिची तपासणी केली असता डोक्यावरील गाठ ही ब्रेन ट्यूमरची असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तातडीने या महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी सकाळी ८ वाजता या शस्त्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. यानंतर दुपारी साडेबारा वाजता ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या शस्त्रक्रियेमध्ये तब्बल ७०० ग्रॅमची गाठ काढण्यात आली आहे. ही शस्त्रक्रिया वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे, ओएसडी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनात न्यूरो सर्जन डॉ. अमोल ढगे, डॉ. अभिजित बेले, दीपा देशमुख, मनीषा रामटेके. आकाश काळे यांनी यशस्वी केली.
मागील काही महिन्यांपासून महिलेच्या डोक्याचा आकार वाढत होता तसेच तिची डोकेदुखीदेखील वाढली होती. यावेळी तपाणीमध्ये तिला ट्यूमर असल्याचे लक्षात आले. चार तासांची शस्त्रक्रिया पूर्ण करून जवळपास ७०० ग्रॅमची ही गाठ काढण्यात आली असून महिलेच्या प्रकृतीमध्ये सुधारणा आहे.- डॉ. अमोल ढगे, न्यूरो सर्जन