अमरावती : चोरीच्या दाखल गुन्ह्यामध्ये अटक न करण्याकरता, अटक केले तर लवकर जामिन मिळविण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस उपनिरिक्षकासह हवालदाराला बुधवारी रात्री अटक करण्यात आली. याप्रकरणी भातकुली पोलिसांनी दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
सहायक पोलीस उपनिरिक्षक गजानन प्रल्हादराव खुरकटे (५६) व हवालदार मोहम्मद इस्माईल शेख उमर(५२) असे लाचखोर पोलिसांची नावे आहेत. शहर आयुक्तालयातील भातकुली पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. आपल्या साळ्याविरूध्द भातकुली ठाण्यात शेतातील पाण्याची मोटर चोरीचा गुन्हा दाखल असून, त्यात त्याला अटक न करण्याकरता, अटक केले तर लवकर जमानात मिळवीण्याकरता मदत करण्याकरिता खुरकटे व मोहम्मद इस्माईल हे लाचेची मागणी करीत असल्याची लेखी तक्रार एकाने एसीबीकडे नोंदविली होती.
त्या अनुषंगाने पंचासमक्ष केलेल्या पडताळणी कारवाईदरम्यान तक्रारदाराला खुरकटे व मोहम्मद इस्माईल यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. ३ ऑक्टोबर रोजी सापळा कारवाईदरम्यान आलोसे खुरकटे व मोहम्मद इस्माईल यांना संशय असल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही. मात्र लाचेची मागणी सिध्द झाल्याने १२ ऑक्टोबर रोजी दोघांनाही एसीबीने अटक केली.
एसपींच्या नेतृत्वात कारवाई
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरुण सावंत व देविदास घेवारे, उपअधीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष इंगळे व सतीश उमरे विनोद कुंजाम, निलेश महिंगे, युवराज राठोड, रोशन खंदारे,चालक सतीश कीटकुले, प्रदीप बारबुद्धे यांनी केली.