बडनेरा (अमरावती) : अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गावरील लोणी ते मूर्तिजापूर या टप्प्यात तथाकथित विश्वविक्रमी रस्त्यावर काही ठिकाणी गिट्टी दिसून पडते. पावसाळ्यात किंवा ओव्हरलोड वाहनांमुळे अशा ठिकाणी रस्ता लवकर उखडू शकतो, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे. अपघाताची भीती यामुळे अजूनही कायमच आहे.
विश्वविक्रमाचा गाजावाजा करीत तयार झालेला अकोला महामार्गावरील रस्त्यावर डांबरीकरणही बऱ्याच ठिकाणी एकसमान दिसत नसल्याचे मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालक तसेच परिसरातील गावखेड्यांवरील लोकांचे म्हणणे आहे. नागझिरी फाट्यापासून ते कुरुमपर्यंत बऱ्याच ठिकाणी रस्त्याची गिट्टी दिसून येते. लोणीपासून कामाला सुरुवात झाली. काही अंतरावर हा रस्ता चकचकीत झाला आहे. पुढे मात्र फरक दाखवत असल्याचे वाहनचालकांना अनुभवास येत आहे.
पावसाळा येऊन ठेपला आहे. काही ठिकाणी पाऊसदेखील झाला. पावसामुळे तसेच ओव्हरलोड वाहनांमुळे ज्या ठिकाणी गिट्टी दिसते, तो भाग लवकरच कमकुवत होऊ शकतो, हे जाणकारच नव्हे, तर शेंबडे पोरही सांगेल. महामार्गावर वाहनचालकांना धक्कादेखील लागू नये, असा रस्ता व्हायला पाहिजे होता. तथापि, राजपथ इन्फ्राकॉन कंपनीने विश्वविक्रमाचा नेम डोळ्यांसमोर ठेवला तरी रस्त्याचे केवळ डांबरीकरण, तेही अर्धवट करून त्यांनी ‘गोल’ चुकविला आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
आता बडनेरा ते लोणी मार्गाकडे लक्ष द्या
बडनेरा ते लोणी हे आठ किलोमीटरचे अंतर आहे. गेल्या दहा वर्षांपासून या भागातील लोकांना उखडलेल्या रस्त्याचा प्रचंड मनस्ताप झेलावा लागतो आहे. अद्यापही एका लेनचे अर्धवट काम व त्यावरूनच दोन्ही बाजूची वाहतूक असल्याने मोठा धोका पत्करून ये-जा करावी लागते आहे. या मार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. लोणीसह परिसरातील ग्रामस्थ दैनंदिन कामकाजासाठी अमरावती शहरात येत असतात. अजून किती दिवस आमचा जीव टांगणीला ठेवायचा, असा त्यांचा रास्त सवाल आहे.