श्यामकांत सहस्रभोजने
बडनेरा (अमरावती) : अत्याधुनिक मशिन्स, प्रचंड मनुष्यबळ वापरून तयार करण्यात आलेल्या अमरावती - अकोलाराष्ट्रीय महामार्ग या विश्वविक्रमी रस्त्यावर अवघ्या दीड महिन्यातच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या मार्गाचे डांबरीकरण केवळ विश्वविक्रम नोंदविण्यासाठीच करण्यात आले का?, असा सवाल वाहन चालकांसमोर उभा ठाकला आहे. पावसामुळे या मार्गाची अक्षरश: चाळण होऊ लागली आहे.
गेल्या महिन्यात ७ जून रोजी अमरावती - अकोलाराष्ट्रीय महामार्गावरील लोणी ते नवसाळापर्यंत विश्वविक्रमी रस्ता उभारण्यात आला. तो केवळ डांबरीकरणापुरताच ठरला. पावसाच्या पाण्याने अवघ्या दीड महिन्यातच या रस्त्याला खड्डे पडायला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी रस्त्यासाठी वापरलेले साहित्य दर्जाहीन असल्याचे दिसून येते. हा रस्ता बांधताना वाहनचालक तसेच परिसरातील गाव, खेड्यातील नागरिकांमध्ये रस्त्याच्या कामाबाबत चर्चेला उधाण आले होते.
राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हा रस्ता नियोजित कालावधीत बांधला तेव्हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने विश्वविक्रमाची घोषणा करताच कंपनीने मोठा आनंद साजरा केला होता. पण, दीड महिन्यातच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण गायब होऊन गिट्टी ठळकपणे दिसून येत आहे. अजून अर्धाअधिक पावसाळा बाकी आहे. केवळ दीड महिन्यात विश्वविक्रमी रस्त्यावर एक छोटासा खड्डा पडत असेल तरी रस्त्याचे बांधकाम आणि दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही.
रस्ता निर्मितीत नियोजनाचा अभाव
अत्याधुनिक मशिनद्वारे तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची रुंदी काही ठिकाणी कमी, तर काही ठिकाणी जास्त आहे. रस्त्यावर जिथे पूल आहे त्याठिकाणी रस्ता अरुंद करण्यात आला आहे. निर्मितीदरम्यान नियोजनापेक्षा विक्रमावरच अधिक भर दिला असल्याचे दिसून येते.