अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आ. अकोलावासी डॉ. रणजित पाटील तसे नशीबवान आहेत. गेली दोन टर्म त्यांना टक्कर देईल, असा पैलवानच निवडणुकीच्या आखाड्यात नव्हता तर यंदा २० दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली असताना महाविकास आघाडीचा उमेदवारच ठरला नसल्याने पाटील निश्चिंत दिसतात. असे असले तरी अमरावती विद्यापीठ सिनेट निवडणुकीत भाजप समर्थित पॅनलला बसलेला फटका, अमरावती आणि यवतमाळ जिल्हा या निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरू शकतो, हे सांगण्यास पुरेसा आहे.
पाच जिल्ह्यांतील या मतदारसंघात १ लाख ८५ हजार ९२५ नोंदणीकृत मतदारांची आकडेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. पैकी अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात मतदारांचा हा आकडा ९० हजारांच्या घरात आहे. त्यामुळे या दोन जिल्ह्यांकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही उमेदवाराला परवडणारे नाही. सिनेटच्या निवडणुकीत याची प्रचिती सर्वांना आलीच आहे.
चार महिन्यांपूर्वीच भाजपने डॉ. रणजित पाटील यांची उमेदवारी जाहीर करून प्रचाराचा नारळ फोडला. पाटलांनी स्वत:चा प्रचार सुरू करून मोर्चेबांधणीही केली. तिकडे काँग्रेसने या जागेसाठी पुढाकार घेतला असला तरी महाविकास आघाडीतील इतर दोन प्रमुख पक्षांसोबत अद्याप चर्चा झालेली नाही. सोमवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अमरावतीत येऊन गेले. पक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, उमेदवार देण्यावरून सुरू झालेली काथ्याकूट संपलेली नाही. म्हणून की काय, आपल्यालाच पक्षाची उमेदवारी मिळेल. या आशेवर काही इच्छुकांनी अपक्ष नामांकन दाखल केले आहे. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदा काँग्रेस पक्षाने मतदार नोंदणीत बऱ्यापैकी परिश्रम घेतले आहे.
महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्याच वाट्याला येईल, असा विश्वास बाळगत अकोल्याचे डॉ. सुधीर ढोणे बाशिंग बांधून आहेत. अमरावती शहरातही नोंदणी पेंडालच्या बॅनरवर झळकलेले पोस्टर डॉ. ढोणे यांची इच्छा दर्शवितात. तर अमरावतीचे माजी महापौर मिलिंद चिमोटे यांचेही नाव काँग्रेसकडून इच्छुकांच्या यादीत आहे. बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून किरण चौधरी यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे इतर निवडणुकांप्रमाणे महाविकास आघाडी ऐनवेळी उमेदवार देत असेल तर ही बाब आपसूकच भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे.
मागील कार्यकाळात काय केले?
डॉ. रणजित पाटलांनी परवा गेल्या दोन टर्ममध्ये आपण काय केले, याचा पाढाच वाचला. मात्र, त्यांनी केलेली कामे ही पहिल्या टर्मची असून, दुसऱ्या टर्ममध्ये काय केले, शिवाय ज्यांच्या मतांवर आपण निवडून आलो, त्या पदवीधरांसाठी काय केले. या प्रश्नांवर मात्र, ते निरुत्तरित दिसले. म्हणायला अमरावतीत जनसंपर्क कार्यालय थाटण्यात आले. मात्र, कुणाशीही त्यांचा फारसा संपर्क होऊ शकला नाही. ही बाब पाटलांना अडचणीत आणू शकते. अमरावती विद्यापीठात कर्मचाऱ्यांच्या ४७४ मंजूर पदांपैकी २०० रिक्त आहेत, तर प्राध्यापकांच्या १२० मंजूर पदांपैकी ६० पदांचा गुंता अद्याप सुटलेला नाही.