अमरावती : समाजातील विविध घटकांतील रुग्णांना, दुर्धर आजारी असलेल्यांना आवश्यक शस्त्रक्रिया, औषधोपचार न होऊ शकल्याने तसेच आर्थिक अडचण व वेळेत आरोग्य सेवा न मिळाल्याने जीव गमवावा लागतो. ही गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातील ग्रामीण तसेच आदिवासी भागातील जनतेला आरोग्य सुविधांची माहिती देण्यासोबतच रुग्णांवर ३६ प्रकारच्या आजारांवरील शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार करण्यासाठी ‘अमरावती आरोग्यम्’ पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील ज्या रुग्णांना ३६ आजारांपैकी ज्या शस्त्रक्रियेसाठी निवड होईल, त्या रुग्णांवर कुठलाही आर्थिक भार न पडता आरोग्य विभागाद्वारे शस्त्रक्रिया व उपचार केले जातील. शस्त्रक्रियेकरिता निवड झालेल्यांना तसेच रोगनिदान झालेल्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी प्रवृत्त करून राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या माध्यमातून लाभ दिला जाईल.
‘अमरावती आरोग्यम्’ पोर्टल अंतर्गत ३६ प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी उपचारपद्धती नमूद असून, त्याखाली २२६ वर्गवारी आहेत. ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांना गावातील व्यक्तींचे आरोग्यविषयक इतिहास माहीत असल्याने तिच्यामार्फत ग्रामीण रुग्णांना घरबसल्या उपचाराची तारीख व ठिकाण याबाबत अवगत केले जाईल. संबंधित गावच्या आशा स्वयंसेविका ‘अमरावती आरोग्यम्’ पोर्टलवर रुग्णांची नोंदणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असून, या कामासाठी आशा स्वयंसेविकेला दोनशे रुपये मोबदला दिला जाईल.
००००००००००००००००
बॉक्स
जिल्हाधिकाऱ्यांची संकल्पना आकारास
‘अमरावती आरोग्यम्’ पोर्टल हे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेतून आकारास आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब, गरजू रुग्णांना आरोग्य सेवा मिळणे सोईचे व्हावे, या उद्देशाने पोर्टल कार्यान्वित करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्याद्वारे या अभियानाची जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०२० पासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
००००००००००००००००००००००
पोर्टलवर अशी करावी लागेल नोंदणी
जिल्ह्यातील कोणत्याही गरजू व्यक्तीस त्यांच्या मोबाईलवरून या पोर्टलवर रुग्णाची नोंद करता येते. यासाठी गुगलमध्ये जाऊन ‘अमरावती आरोग्यम् डॉट ईन’ असे असे टाईप केल्यास रुग्ण नोंदणी फॉर्म दिसून आल्यावर त्यात रुग्णाची माहिती अर्जदाराने किंवा स्वयंसेविकेच्या माध्यमातून भरुन रुग्णाची नोंदणी करता येते. ही माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्यम कक्ष पडताळणी करून रुग्णास तपासणीची तारीख व स्थळ याबाबत मोबाईलवर संदेश पाठवितो. त्यानुसार रुग्णाने दिलेल्या तारखेत आपली आरोग्य तपासणी करून घ्यावयाची आहे. तपासणीत आढळून आलेल्या आजाराचे पुढील उपचार हे विनामूल्य केले जातात.
०००००००००
२५५ रुग्णांवर उपचार, ३६ रुग्णांची शस्त्रक्रिया
‘अमरावती आरोग्यम्’ पोर्टल आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २७०१ व्यक्तींनी नोंदणी केली असून, २५२१ रुग्णांना तपासणीची तारीख प्राप्त झाली आहे. त्यापैकी २५५ रुग्णांवर उपचार पूर्ण झाला असून, ३६ रुग्णांवर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ते सध्या निरोगी जीवन जगत आहेत.
००००००००००००००००००००००००
कोट
जनतेचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्याच्या दृष्टीने या पोर्टलची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. आरोग्यसेवा नि:शुल्क आहे.
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी,