अमरावती : अहमदनगर जिल्ह्यात मानोरी येथील ॲड. राजाराम आढाव आणि ॲड. मनीषा राजाराम आढाव यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावे व जलद गती न्यायालयात चालविण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा बार असोसिएशनद्वारे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली व मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
हल्लेखोरांनी वकील दाम्पत्याची हत्या करण्यापूर्वी त्यांचे न्यायालय परिसरातून अपहरण केले व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेताची विल्हेवाट लावण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेला देण्यासोबत अन्य मागण्यांचा ठराव जिल्हा वकील संघाच्या २९ जानेवारीच्या विशेष आमसभेत घेण्यात आलेला आहे.
वकिलांवर होत असलेले हल्ले, हत्या हा विषय अत्यंत गंभीर असल्याने वकील संरक्षण कायदा तत्काळ मंजूर करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी जिल्हा वकील संघाचे पदाधिकाऱ्यांसह शेकडो सदस्य उपस्थित होते.