अमरावती : महागडया दुचाकी चोरून त्या कमी किमतीत, प्रसंगी कवडीमोल भावात विकणाऱ्या एका सराईत चोराला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. १२ फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली. सुभाष नामदेव चावणे (३३, रा. सराईपुरा, अचलपुर) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्हयातील मोटर सायकल चोरीला आळा बसावा, यासाठी कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्याकरीता पथक देखील नेमण्यात आले. दरम्यान, एलसीबीचे पथकाला चावणे व त्याच्या साथीदारांविषयी माहिती मिळाली. त्या दोन सराईत चोरांनी मिळून दुचाकी चोरल्या व त्या कमी किमतीत विकल्याच्या माहितीवरून १२ फेब्रुवारी रोजी सुभाष बावणे याला ताब्यात घेण्यात आले. त्याने त्याच्या साथीदारासह अचलपूर, अंजनगाव सुर्जी, आसेगाव, सरमसपुरा व चांदूररेल्वे येथून प्रत्येकी एक अशा एकूण पाच दुचाकी चोरुन त्या वेगवेगळ्या गावात कमी किमतीत विकल्याची कबुली दिली.
ज्यांना विकल्या, तेथून जप्त
आरोपीने चोरीच्या त्या पाच दुचाकी वेगवेगळ्या गावातील ज्या व्यक्तींना विकल्या, तेथे जाऊन त्या १ लाख ९२ हजार रुपये किमतीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. आरोपीला आसेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीकडून आसेगाव, सरमसपुरा, अंजनगाव सुर्जी, चांदूररेल्वे व अचलपुर येथील वाहनचोरीचे गुन्हे उघड झाले. सहायक पोलीस निरिक्षक रामेश्वर धोंडगे, अंमलदार दिपक उके, युवराज मानमोठे, स्वप्नील तंवर, रविंद्र व-हाडे, सागर नाठे, चालक राजेश सरकटे यांनी ही कारवाई केली.
जुने वाहन विकत घेतांना कागदपत्राची व विकत घेत असलेल्या वाहनाची बारकाईने पाहणी करावी. संपुर्ण खात्री करुनच जुन्या वाहनाचा व्यवहार करावा. कमी किमतीत वाहन मिळते, म्हणून ते घेऊ नका.
- अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक