- गजानन मोहोडअमरावती - पायलट होण्याचे अंशूमचे स्वप्न हवेत विरले. फिलिपिन्समधील मनिला येथे उड्डाणादरम्यान ऑगस्ट २०२३ मध्ये विमान अपघातग्रस्त झाल्याने मृत्यू झालेल्या २० वर्षीय अंशूमच्या इन्शुरन्सबाबत तेथील इको एअर इंटरनॅशनल अकॅडमी सहकार्य करीत नाही. शिवाय नागपूर येथील संबंधित अकॅडमीचेही सहकार्य नसल्याचा आरोप अंशूमचे पिता राजकुमार कोंडे यांनी शुक्रवारी केला.
मोर्शी येथील राधाकृष्ण कॉलनीतील रहिवासी निवृत्त ग्रामसेवक राजकुमार कोंडे यांचा मुलगा अंशूम याने नागपूरच्या निओ एव्हिएशन अकॅडमीमध्ये दोन वर्षे प्रशिक्षण घेतले व त्यांच्याच माध्यमातून तो फिलिपिन्स येथील इको एअर इंटरनॅशनल अकॅडमीमध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण घेत असताना उड्डानादरम्यान त्याचे छोटेखानी विमान उपघातग्रस्त झाले व त्यामध्ये अंशूमचा मृत्यू झाला. १२ दिवसांनी त्याचे पार्थिव मिळाले होते, असे कोंडे म्हणाले.
अंशूमचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर फिलिपिन्स येथील सदर अकॅडमीने फीपोटी घेतलेले १५ लाख परत केले नाहीत. शिवाय इन्शुरन्सविषयीची माहिती दिलेली नाही. शिवाय त्याची बॅग अद्याप पाठविलेली नाही. याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असताना अकॅडमीचे सहकार्य मिळत नसल्याने आपण व्यथित झाल्याचे कोंडे म्हणाले.
दूतावासाचेही सहकार्य मिळत नाहीफिलिपिन्स दूतावासाला अनेकदा मेल केले आहेत. मात्र, त्यांच्याकडून सहकार्य मिळत नाही. जावयाचे बंधू पीयूष व्यवहारे यांना पॉवर ऑफ अटर्नी दिलेले आहे. ते फिलिपिन्स येथेच आहेत. त्यांच्यामार्फत आता प्रयत्न करीत आहोत. नागपूर येथील निओ अकॅडमीमार्फत अंशूमने फिलिपिन्स येथील अकॅडमीत प्रवेश घेतला होता. त्यांच्याद्वारे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप राजकुमार कोंडे यांनी केला आहे.