पान ३ लीड
सेमाडोह, कोलकास, गाविलगड किल्ला, चिखलदरा गार्डन बंद, अकोल्यात मात्र पर्यटनास अनुमती
अनिल कडू
परतवाडा : अमरावती व बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांचे पर्यटनाकडे दुर्लक्ष असून अद्यापही त्यांनी पर्यटनास अनुमती दिलेली नाही. पर्यटनक्षेत्र खुले केले नाही. अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र एका स्वतंत्र आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांकरिता खुली केले आहेत.
अमरावती व बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांच्या नकारघंटेमुळे व्याघ्र प्रकल्पांतील जंगल सफारी, हत्ती सफारी, वन विश्रामगृह, निसर्ग पर्यटन संकुल, उपाहारगृह, होम स्टे, पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून घोषित केंद्रीय संरक्षित स्मारके, स्थळे, संग्रहालय आणि सेमाडोह, कोलकास, गाविलगड किल्ला व चिखलदरा गार्डन आजही बंद आहेत.
दरम्यान, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने आपल्या १४ जूनच्या पत्रान्वये १६ जून २०२१ पासून राष्ट्रीय महत्त्वाची प्राचीन संरक्षित स्मारके, पुरातत्त्वीय स्थळ आणि अवशेष पर्यटनाकरिता खुले केले आहेत. या पत्रालाही अमरावती व बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केले आहे. पर्यटनाच्या अनुषंगाने अकोला जिल्हाधिकाऱ्यांनी २ जुलैला स्वतंत्र आदेश निर्गमित केले. यात अकोला जिल्ह्यातील सर्व केंद्रीय संरक्षित स्मारके, स्थळे व संग्रहालय त्यांनी पर्यटनाकरिता खुली केली आहेत.
अकोला जिल्ह्याच्या परिक्षेत्रात येणाऱ्या व्याघ्र प्रकल्प अंतर्गत जंगल सफारीसह वन विश्रामगृह, निसर्ग पर्यटन संकुल, उपाहारगृह, होम स्टे व व्याघ्र प्रकल्पाद्वारे घेण्यात येणाऱ्या इतर उपक्रमास त्यांनी अनुमती दिली आहे. केवळ बंदिस्त प्राण्यांच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास त्यांनी प्रतिबंध केला आहे. अमरावती व बुलडाणा व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात कुठेही बंदिस्त प्राणी नाहीत. चिखलदरा गार्डन आणि सेमाडोह निसर्ग निर्वाचन संकुलात जे प्राणी दिसतात, ते त्या प्राण्यांचे निर्जीव पुतळे आहेत. त्यामुळे अकोला जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणेच अमरावती व बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटनास मुभा देण्याची पर्यटनस्थळे खुली करण्याची मागणी पर्यटकांकडून केली जात आहे.