अमरावती : बँक खात्यातून परस्पर पैसे चोरणा-या टोळीतील जितेंद्रकुमार अनिलकुमार (२५,रा. न्यु दिल्ली) याला अमरावती पोलिसांनी चंद्रपूरहून ताब्यात घेतले. त्याने अमरावतीतील १४ ते १५ बँक खात्यांतील सुमारे पाच लाखांची रक्कम विड्रॉल केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्याची कसून चौकशी गुन्हे शाखेचे पोलीस करीत आहे.
अमरावतीतील २४ बँक खातेदारांच्या खात्यातून सुमारे २२ लाखांची रक्कम परस्पर चोरी गेली. या टोळीतील पहिला आरोपी परितोष पोतदार याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. चार आरोपींना चंद्रपूर पोलिसांनी अटक केली होती. त्या चारही आरोपींना प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्यासाठी अमरावती पोलीस चंद्रपूर गेली होती. ३० डिसेंबर रोजी अमरावती पोलिसांनी या टोळीतील मुख्य आरोपी हरिदास हरविलास विसवास (२९,रा. मलकानगिरी, ओडीशा), विशाल तुळशीराम उमरे (३४,रा. वरोरा, चंद्रपूर) व किसन लालचंद यादव (३०,रा. गाजीपूर, दिल्ली) या तिघांना प्रॉडक्शन वॉरंटवर चंद्रपूरहून ताब्यात घेऊन अमरावतीत आणले. पोलीस चौकशीनंतर विसवास हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने एटीएमधारकांचा डेटा चोरून त्याद्वारे बनावट एटीएम तयार करीत असल्याचे स्पष्ट झाले.
बनावट एटीएम साथीदारांना देऊन बँक खात्यातून पैसे विड्रॉल केले जात होते. या प्रकरणातील जितेंद्रकुमार हा आजारी असल्यामुळे अमरावती पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले नव्हते. मंगळवारी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चाटे यांचे पथक चंद्रपूरला गेले. त्यांनी जितेंद्रकुमारला प्रॉडक्शन वारंटवर ताब्यात घेऊन अमरावतीत आणले. त्याने एटीएमद्वारे खातेदारांचे पैसे विड्रॉल केल्याची कबुली पोलिसांना चौकशीदरम्यान दिली. या प्रकरणातील ब्रम्हानंद नावाचा आरोपी पसार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.