अमरावती - शहर पोलीस आयुक्तालय सीसीटीएनएस (क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम) प्रणालीच्या कामकाजात अमरावती राज्यात अव्वल ठरले असून, येथील वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीत पोलीस शिपाई निखिल पांडुरंग माहुरे अव्वल ठरले आहे. पुणे येथील पोलीस कर्तव्य मेळाव्यात शहर पोलीस आयुक्तालयातून प्रतिनिधी म्हणून गेलेले पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित व पोलीस शिपाई निखिल माहुरे यांना गौरविण्यात आले.
राज्यभरातील बहुतांश पोलीस ठाणे सीसीटीएनएस प्रणालीशी जोडण्यात आले असून, हा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी सुरू झाला आहे. तक्रारींची ऑनलाईन नोंद करण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित असून, यामुळे पेपरलेस कामकाजाला गती आली आहे. या प्रणालीशी जुळलेल्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या कामगिरीवर पोलीस प्रशासनाने लक्ष वेधून कामकाजाचे परीक्षण केले आहे. पोलीस कर्तव्य मेळाव्यांतर्गत सीसीटीएनएसमध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस घटकाला व वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्यात येते. यासंबंधाने प्रस्ताव मागविण्यात आले होते. राज्यभरातील सर्व प्रस्तावांचे तज्ज्ञांकडून परिक्षण करण्यात आले असून, त्यात अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने प्रथम स्थान पटकाविले आहे. ३ नोव्हेंबर रोजी पुणे येथील पोलीस कर्तव्य मेळाव्यातील बक्षीस वितरण सोहळ्यात अमरावती शहर पोलीस आयुक्तालय व निखिल माहुरे यांना गौरविण्यात आले.
द्वितीय रायगड, तृतीय सोलापूर ग्रामीण
सीसीटीएनएस प्रणालीचे उत्कृष्ट कामकाजात द्वितीय क्रमांक रायगड तर तृतीय सोलापूर ग्रामीणचा लागला आहे. वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीत प्रथम अमरावतीचे निखिल व रायगडचे जयेश विलास पाटील यांना बहुमान मिळाला. त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांकावर यवतमाळ येथील पृथ्वीराज बाबुलाल चव्हाण, बिड येथील पोलीस नाईक नीलेश भगतसिंग ठाकूर आणि तृतीय क्रमांकावर सोलापूर शहर येथील पोलीस नाईक देवपुत्र स्वामी मरेड्डी व सोलापूर ग्रामीणचे पोलीस हवालदार इक्बाल अब्दुल रशिद शेख यांनी बहुमान पटकाविला.