नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम ‘एनसीएपी’ अंतर्गत देशभरात घेण्यात आलेल्या स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत अमरावती शहराने देशस्तरावर तिसरा तर, राज्यस्तरावर पहिला क्रमांक पटकाविला आहे. भारत सरकारच्या पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाने त्यासाठी प्रत्येक शहरातील हवेची गुणवत्ता तपासली. त्यात सन २०२२/२३ मधील ‘बेस्ट परफॉर्मिंग सिटीज’ या अंतर्गत तीन लाख ते दहा लाख लोकसंख्येच्या वर्गवारीत अमरावती महापालिकेला २५ लाख रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे.याबाबत केंद्रिय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे अप्पर सचिव नरेश पाल गंगवार यांचेकडून अमरावती महापालिकेला पत्र प्राप्त झाले आहे. अशा प्रकारचे बक्षीस मिळवणारी अमरावती महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एकमेव ठरली आहे. अमरावती महानगरपालिकेमार्फत नॅशनल क्लिन एअर प्रोग्राम अंतर्गत आतापर्यंत केलेल्या कामगिरीचा हा परिणाम असून या बक्षिसाचे वितरण ३ डिसेंबर रोजी केंद्रीय पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते भुवनेश्वर येथे होणार आहे.या बक्षिसामुळे अमरावती महानगरपालिकेला भविष्यात पर्यावरणा संवर्धनाच्या दृष्टीने आणखी चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. महापालिकेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सांघिक प्रयत्नांचा तो परिपाक आहे.डॉ. प्रवीण आष्टीकर, आयुक्त
स्वच्छ वायू सर्वेक्षणात अमरावती शहर देशात तिसरे
By प्रदीप भाकरे | Published: December 02, 2022 5:01 PM