- गणेश वासनिक
अमरावती : घरची आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून शिकू शकलो नाही, असे अनेकजण म्हणतात. मात्र, अमरावतीच्या झोपडपट्टीत राहून चहाची टपरी चालवणाऱ्या व्यक्तीच्या मुलाने जिद्द आणि चिकाटीने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात एम.ए. ‘कम्पॅरिटिव्ह इन इंटरनॅशनल एज्युकेशन’ या विषयाच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळविला आहे. विकास तातड असे या तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे तो कोलंबियात शिक्षणासोबतच ‘पार्टटाईम जॉब’देखील करणार आहे. त्यासाठी त्याला महिन्याला दीड लाख पगार मिळणार आहे. विकासच्या या भरारीमुळे त्याचे आई-वडील आणि मित्रमंडळी भारावून गेले आहेत.
विकासचा कोलंबियापर्यंत खडतर प्रवास...विकासचे वडील कृष्णा तातड हे येथील दयासागर रुग्णालयाजवळ चहाची टपरी, तर आई रेखा या घरीच छोटेशे दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. मात्र, मुलांच्या शिक्षणासाठी ते काहीच कमी पडू देत नाहीत. विकासने केशरबाई लाहोटीमहाविद्यालयातून बी.कॉम आणि नंतर मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. याच दरम्यान त्याला पेपर प्रेझेंटेशनसाठी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीत जाण्याची संधी मिळाली. यावेळी त्याने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेतले त्या विद्यापीठाला भेट दिली. त्याचवेळी त्याने या विद्यापीठात आपल्याला शिक्षण घ्यायचे आहे, असा निर्धार केला. मात्र, या शिक्षणासाठी त्याला सव्वा कोटी रुपये खर्च येत होता.
विकासचा व्हिसा तीनवेळा नाकारला गेला...महाराष्ट्र सरकारची राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती विकासला मंजूर झाली. मात्र, व्हिसा काढताना या शिष्यवृत्ती शिवाय खात्यात किती पैसे आहे? असे विचारण्यात आले. खात्यात पैसे नसल्याने कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नव्हती. त्यामुळे तब्बल तीनवेळ व्हिसा नाकारला गेला. अखेर चौथ्यांदा समाजातील काही नागरिकांनी त्याला ३० ते ४० लाख रुपयांची मदत केली आणि त्याचा व्हिसा तयार झाला. १३ जानेवारीला कोलंबियासाठी नागपूरच्या विमानतळावरून उड्डाण घेणार असल्याचे विकासने ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
आई-वडील समाधानी...विकासला अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या टीचर्स कॉलेजमध्ये दोन वर्षासाठी एम.ए. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने विकासने त्याच युनिव्हर्सिटीत दीड लाख रुपये महिन्याने ग्रंथालयात पार्ट टाईम जॉबसुद्धा शोधला आहे. विकासला अमेरिकेत जाण्याची व शिक्षणाची संधी मिळाल्याने त्याच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त केलाय. तसेच विकासने त्याच्याबरोबरच आणखी गरजू होतकरू विद्यार्थ्यांना अमेरिकेत घेऊन जावे व त्यांना मदत करावी, अशीदेखील इच्छा विकासच्या आई-वडिलांनी व्यक्त केलीय. विकास आजही वडिलांना त्यांच्या चहा टपरीवर मदत करत असतो. विकासची बहीणसुद्धा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधूनच पोस्ट ग्रॅज्युएट झाली आहे. लहान भाऊ विपिन हा रॅप गायक आहे. विकासच्या मित्रांनीही विकासने उंच भरारी घेतल्याचे आनंद व समाधान व्यक्त केले.