अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. “तुमचा दाभोळकर होणार,” असे ट्वीट करत ही धमकी देण्यात आली. सौरभ पिंपळकर या ट्विटर हँडलवरुन हे धमकीचे ट्वीट करण्यात आले आहे. शरद पवार यांना धमकी देणारा सौरभ पिंपळकर अमरावतीचा असल्याचे म्हटले जात आहे. भाजपचा कार्यकर्ता असल्याचेही त्याच्या अकाउंटवर नोंदविलेले आहे. मात्र, हे अकाउंट ओरिजिनल आहे की फेक, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि घटनेचे गांभीर्य ओळखून अमरावती शहर पोलिसांनी सौरभ पिंपळकरचा शोध सुरू केला आहे.
पवार यांना धमकी देणारा साैरभ पिंपळकर हा अमरावतीचा असल्याची प्राथमिक माहिती हाती आल्याने त्याच्या अकाउंटची सखोल तपासणी करण्याचे आदेश येथील पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सायबर पोलिसांना दिले आहेत. सौरभ पिंपळकरविरुद्ध पेपर फोडल्याप्रकरणी याआधी २० मे रोजी गाडगेनगर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंद असल्याने गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनादेखील त्याला शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांना तो घरी आढळून आला नाही. त्याचा मोबाइलदेखील बंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. येथील विदर्भ महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर २० मे रोजी सकाळी ९ ते १२ या कालावधीत लॉच्या चौथ्या सेमिस्टरचा पेपर सुरू असताना पिंपळकर हा परीक्षार्थी होता. त्याने मोबाइल आतमध्ये नेत लॉ ट्रस्ट या विषयाची प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवरून दुसऱ्याला पाठविल्याचे निष्पन्न झाले होते. त्याच्यासह गाडगेनगर पोलिसांनी भाजयुमो जिल्हाध्यक्ष प्रणीत सोनी व भूषण हरकुट यांना अटक केली होती.
धमकी प्रकरणातील सौरभ पिंपळकर हा अमरावतीचा असल्याचे प्राथमिक चौकशीत कळले. यापूर्वी त्याच्याविरुद्ध पेपर लीक केल्याप्रकरणी गाडगेनगरमध्ये गुन्हा नोंद आहे. धमकीप्रकरणी अद्यापपर्यंत आमच्याकडे तक्रार आलेली नाही. आम्ही गांभीर्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
नवीनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त