प्रदीप भाकरे ,अमरावती: सन २००३ मधील बॅचच्या थेट पोलीस उपअधीक्षक असलेल्या कल्पना बारवकर यांनी मंगळवारी शहर पोलीस आयुक्तालयात उपायुक्त पदाची सुत्रे स्विकारली. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्यांच्याकडे मुख्यालयाची जबाबदारी दिली असून डीसीपी एचक्यू म्हणून त्यांच्याकडे गुन्हे शाखा व वाहतूक शाखेचे सुकाणू असेल. शनिवारी ‘लोकमत’शी त्यांनी संवाद साधला. पुणे शहर आयुक्तालयात वाहतूक डीसीपी म्हणून कार्य केले आहे. तो अनुभव गाठीशी असल्याने येथे देखील शिस्तबध्द वाहतुकीच्या नियोजनाला, वाहतूक नियमनाला आपले प्राधान्य राहिल, असे बारवकर म्हणाल्या. विशेष म्हणजे बारवकर यांच्या रूपाने शहर आयुक्तालयाला तिसऱ्या पोलीस उपायुक्त मिळाल्या. एकाचवेळी तीनही पोलीस उपायुक्त कार्यरत असल्याचे सुखद चित्र अनेक वर्षानंतर पाहावयास मिळाले आहे. सन २००७ मध्ये अकोला एसडीपीओ म्हणून पोलीस सेवेत रूजू झालेल्या बारवकर यांनी बुलढाणा, औरंगाबाद येथे देखील सेवा दिली आहे. सन २०१५ ला पदोन्नतीने त्या भंडारा अपर पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाल्या. याशिवाय त्यांनी पुणे शहर आयुक्तालयात वाहतूक डीसीपी म्हणून त्यांनी पुण्याच्या वाहतुकीचे योग्य नियमन केले. सीआयडीमध्ये काम करण्याचा अनुभर देखील त्यांच्या गाठीशी आहे. त्यांनी नांदेड परिक्षेत्राच्या एसीबीच्या पोलीस अधीक्षक म्हणून देखील कार्य केले आहे.
आयजी रैंकने अपग्रेडझालेल्या आयुक्तालयाला कल्पना बारवकर यांच्या रूपाने नव्या पोलिस उपायुक्त मिळाल्या आहेत. नानवीज दौंडस्थित पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य असलेल्या बारवकर यांची १५ फेब्रुवारी रोजीच्या आदेशाने अमरावती शहर पोलिस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. त्या येथे २० फेब्रुवारी रोजी रुजू झाल्या.