अमरावती : नवीन वर्षात जिल्ह्यात दरदिवशी संक्रमित रूग्ण संख्या वाढत आहे. सोमवारी पुन्हा ४४९ पॉझिटिव्ह आढळून आले असून, चार रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत २५ हजार ७४३ संक्रमितांची नोंद आरोग्य यंत्रणेने घेतली आहे. जिल्ह्यातील १३ रूग्णालयात ५०९ रूग्ण उपचार घेत आहेत.
जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र, गत पाच दिवसात कोरोना संक्रमित रूग्ण संख्येने तीन शतकी आकडा ओलांडला आहे. सोमवारी तर यात अधिक भर घातली असून, यंदा नव्या वर्षात सर्वाधिक ४४९ पॉझिटिव्ह रूग्णसंख्येची पहिल्यांच नोंद करण्यात आली आहे. गृह विलगीकरणात महापालिका क्षेत्रात २२५ तर, ग्रामीण भागात ४८० रूग्ण उपचार घेत आहे. चार रूग्णांचा मृत्यू झाला असृून, आतापर्यत ४३९ मृत्यूसंख्या झाली आहे. ॲक्टिव्ह रूग्ण १२१४ आहे.