लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात संचारबंदी व सर्वत्र कोरोनाचे वातावरण असताना जीव धोक्यात घालून आरोग्यसेवा देण्याकरिता तत्पर असलेलेल्या काही डॉक्टर, नर्सेसला शहरातील काही घरमालकांकडून घर रिकामे करण्यासाठी सक्ती केली जात असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.संचारबंदीच्या स्थितीत नवीन घर कसे शोधावे, अशी चिंता डॉक्टर, नर्सेसना लागली आहे. त्यांनी या प्रकाराची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांच्याकडे बुधवारी नोंदविली. त्यानंतर खोडके यांनी भ्रमणध्वनीवरून पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर व महापालिका आयुक्त प्रशांत रोेडे यांच्याशी संपर्क करून त्यांना हा प्रकार सांगितला. अशा घरमालकांविरोधात कारवाई केली पाहिजे, अशी सूचना खोडके यांनी अधिकाऱ्यांना केली. संकटाच्या वेळी पाठीशी राहण्याऐवजी घरमालकांकडून सक्ती करणे ही बाब योग्य नसल्याची भावना त्या डॉक्टर, नर्सेसनी व्यक्त केली. सदर डॉक्टर व नर्सेस येथील काही खासगी डॉक्टरांकडे सहायक म्हणून नोकरी करीत असल्याची माहिती आहे. मात्र, यासंदर्भात कुठल्याही ठाण्यात त्यांनी लेखी तक्रार दिली नाही.काही डॉक्टर व नर्सेस माझ्याकडे आले. त्यांना घरमालकांनी घर खाली करण्यास सांगितले. मी पोलीस आयुक्त व महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.- संजय खोडके, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस