लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: दिवाळीच्या पाडव्याला काढण्यात आलेल्या गवळण नृत्याची परंपरा मोर्शीकरांनी यंदाही जोपासली. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील पारंपरिक पद्धतीने गवळण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. रामजीबाबा देवस्थान येथून या गवळण सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. यामध्ये सर्व जाती-धमार्तील लोकांनी सहभाग घेतला होता.गावातून ढोलकी, तुणतुनी, बासरी, मंजिरा वाजवत ही गवळण दिवाळीचे गाणे एका सुरात गाऊन त्यावर ताल धरत नाचत होती. यावेळी गवळणीचे सोंग घेतलेले युवकसुद्धा चांगलेच मुरके घेत होते. ही पारंपरिक गवळण मोर्शी शहरात दरवर्षीच आयोजित केली जाते. गवळण पाहण्याकरिता परिसरातील शेकडो नागरिक या ठिकाणी येतात. दिवाळीच्या पाडव्याला घरासमोरील शेणाच्या सड्यावर गवळण नाचविणे, छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे गाऊन समाजप्रबोधन करणे अशी या परंपरेमागील भूमिका आहे. ही गवळण घरोघरी जाऊन नाचत-गात सरतेशेवटी ह्यलावा घरधन्याला कुंकवाचे बोटह्ण असे म्हणत घरधन्याला हाताने टिक्का लावून त्यांच्याकडून बक्षीस घेतले जाते. गवळणीसोबत एक ढोलक्या व एक लोकगीतगायक असतो. यात बासरी वाजवणारा युवक सर्वांचे आकर्षण ठरतो. विशेष म्हणजे, ही गीते पुस्तकातील नसतात, तर ती स्वत: तयार केलेली असतात.मोर्शी येथील शाहीर धनराज मनगटे, राजेंद्र बोबडे, वैभव बोबडे यांनी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे मिस्त्रीकाम करणारा राजू कुंभारकर याला गवळणीच्या रूपाने पाचारण केले. त्याच्यासोबत बैतूल जिल्ह्यातील सांडिया गावातील गणपत इंगोले ढोलक मास्तर, चोंडके वाजिवणारा वासुदेव झाकडे, बासरी वादक विजय कांबळे यांचा सहभाग होता. ही गवळण काढण्यासाठी तोताराम उके यांनी पुढाकार घेतला.
अमरावती जिल्ह्यात मोर्शीकरांनी जपली गवळणीची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 11:01 AM