- जितेंद्र दखणे अमरावती - येथील महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळाला गत दोन वर्षापासून विभागीय अध्यक्ष नसल्यामुळे विभागीय शिक्षण मंडळाचा कारभार प्रभारीवर सुरू आहे.
अमरावती विभागीय शिक्षण मंडळाची स्थापना १९९१ मध्ये करण्यात आली होती. स्थापनेपासून अमरावती विभागीय शिक्षण मंडळाला अद्यापपर्यत एकूण ३१ वेळा अधिकारी मिळाले. त्यापैकी पूर्णवेळ विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी अमरावती विभागीय शिक्षण मंडळाने १० वेळा सांभाळली. तर अतिरिक्त पदभार हा सचिवाच्या माध्यमाने २० वेळा सांभाळण्यात आल्याचे वास्तव मंडळाच्या विभागीय कार्यालयाच्या कार्यकाळाच्या फलकावरून दिसून येत. परिणामी अमरावती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिवाला अनेकदा अतिरिक्त पदभार सांभाळावा लागत आहे. यामुळे शिक्षण मंडळाची कामे करतांना मोठी कसरत होत आहे. अतिरिक्त पदभार सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यावर कामाचा ताण येत असून याचा परिणाम शिक्षणामंडळाच्या कामावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.