अमरावती - संपत्तीचा वाद व लेक-सुनेच्या त्रासाला कंटाळून बापाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील ही घटना आहे. विठ्ठल जोतीराम पांडे (वय 76 वर्ष) असे मृताचे नाव आहे. त्याच्या खिशात मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी दोन मुले व सून अशा एकूण तीन जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 16 जानेवारीपूर्वी विठ्ठल पांडे यांनी आत्महत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान संपत्तीच्या वादातून विठ्ठल पांडे यांना दोन मुले व सून त्रास देत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ते दररोज वाद व शिवीगाळ करीत भांडण करत असत. या त्रासालाच कंटाळून विठ्ठल पांडे यांनी विषारी औषध पिऊन स्वतःचं आयुष्य संपवलं, अशी तक्रार मृत विठ्ठल पांडेंचा मुलगा रघुनाथ व त्याची पत्नी सविता यांनी दिली.
याप्रकरणी शिरखेड पोलिसांनी उमेश (४४), दिनेश (३८) व सून कल्पना दिनेश पांडे यांचयावर भांदवि कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. या प्रकरणाचा तपास शिरखेडचे ठाणेदार नितीन चव्हाण करत आहेत.