लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारंसघांपैकी भाजपने एकमेव जागेवर विजय मिळविला. शिवसेनेला खातेही उघडता आले नाही. काँग्रेसने तीन जागा पटकावल्यात. महाआघाडीतील अपक्षाने एक जागा राखली. उर्वरित तीन जागांवर अपक्षांनी बाजी मारली. एकूण चार जागा घेऊन अपक्षांनी अमरावती जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीवर वर्चस्व राखले आहे.अमरावती मतदारसंघात काँग्रेसच्या सुलभा संजय खोडके यांनी भाजपचे मावळते आमदार सुनील देशमुख यांना पराभूत केले.बडनेरा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीतील अपक्ष रवि राणा यांनी शिवसेनेच्या उमेदवार प्रीती बंड यांचा पराभव केला. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी शिवसेनेचे राजेश वानखडे यांना पराभूत करून विजयाची हॅटट्रिक केली. धामणगाव रेल्वे मतदारसंघात चौथ्यांदा रिंगणात असलेले काँग्रेसचे मावळते आमदार वीरेंद्र जगताप यांचा भाजपचे प्रताप अडसड यांनी पराभव केला. दर्यापूर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी भाजपचे मावळते आमदार रमेश बुंदिले यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मोर्शी मतदारसंघात अपक्ष देवेंद्र भुयार हे जायंट किलर ठरले. त्यांनी राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे यांचा पराभव केला. अचलपूर मतदारसंघात आमदार बच्चू कडू यांनी काँग्रेसचे अनिरुद्ध देशमुख यांचा पराभव करून चौथ्यांदा विधानसभा गाठली. मेळघाट मतदारसंघात अपक्ष राजकुमार पटेल यांनी शासकीय सेवेचा राजीनामा देऊन भाजपची उमेदवारी घेणारे रमेश मावस्कर यांना पराभूत केले. हे दोघे आमदारपुत्र आहेत. आणखी एक आमदारपुत्र केवलराम काळे हे याच मतदारसंघात राष्ट्रवादीकडून रिंगणात होते.
अमरावती निवडणूक निकाल; मतदारराजाने दिला अपक्षांना कौल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 8:28 PM