मोर्शी (अमरावती) : तालुक्यातील विष्णोरा येथील ५० वर्षीय शेतक-याने आर्थिक विवंचनेतून बुधवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. विलास किसनराव ठाकरे (५०) असे मृताचे नाव आहे. त्यांच्याकडे ओलीत व कोरडवाहू अशी १२ एकर शेती होती. बँक आॅफ इंडिया, महिंद्रा फायनान्स व निशांत सहकारी बँक यांचे सहा लाख रुपये कर्ज होते. कर्ज वसुलीसाठी बँकेने तगादा लावला होता. शेतात मागील वर्षात ५०० संत्राझाडे होती. झाडांना पाणी नाही म्हणून कर्ज घेऊन बोअर केले. त्याला पाणी लागले नाही. त्यातच या वर्षात सोयाबीनने दगा दिला, बोंडअळीने कपाशी फस्त केली, तर तुरीचे पीक सुकले. त्यामुळे आर्थिक विवंचना त्यांच्या पाठीशी होतीच; यातून त्यांनी शेतातील महारूखच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्यांच्या मागे पत्नी आणि बारावी व दहावीत शिकणाºया दोन मुली आहेत. मोर्शी येथे उपजिल्हा रुग्णालयात ४ जानेवारी रोजी शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला.याप्रकरणी मोर्शीचे तहसीलदार तसेच शिरखेड पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. ठाणेदार नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पोलीस शिपाई मनोज टप्पे, रामेश्वर इंगोले करीत आहेत.
अमरावती : आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन शेतक-याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 6:42 PM