- उज्वल भालेकर अमरावती - वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांकडून जास्तीचे शुल्क तसेच नियमानुसार प्रयोगशाळा आणि क्लासरूम नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे येथे शिकत असलेल्या १४ विद्यार्थ्यांनी इतर महाविद्यालयात प्रवेश देण्याची मागणी तंत्रशिक्षण सहसंचालक विभागीय कार्यालयाकडे तक्रार केली होती. परंतु अजूनही महाविद्यालय बदलून न मिळाल्याने या विद्यार्थ्यांनी सोमवारपासून तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
वर्धमान कॉलेज ऑफ फार्मसी येथे विद्यार्थ्यांकडून विविध महाविद्यालयीन शुल्क आकारले जात नसून फार्मसी विभागामध्ये आवश्यक असलेल्या कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. येथे प्राध्यापक हे फक्त कागदोपत्री असून प्रत्यक्षात फक्त तीन ते चारच प्राध्यापक आहेत. तसेच मनमानी शुल्क आकारून विद्यार्थ्यांना ते शुल्क भरण्याची सक्ती करत परीक्षेला बसू न देण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी २९ ऑगस्टला केली होती.
या तक्रारीच्या अनुषंगाने सहसंचालक तंत्रशिक्षण विभागाने २ सप्टेंबर रोजी चौकशी समिती स्थापन करून अहवालही सादर केला आहे. हा अहवालदेखील महाविद्यालयाच्या विरोधात असून पुढील कारवाईसाठी हा अहवाल तंत्रशिक्षण संचालनालयाकडे पाठविण्यात आला आहे. या अहवालामध्ये संबंधित कॉलेजची मान्यता ही दोन वर्षांसाठी रद्द करण्याचे म्हटले आहे. परंतु कॉलेज सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी होऊनही या ठिकाणी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश हे दुसऱ्या महाविद्यालयात ट्रान्सफर करण्यात आलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या संपामध्ये विजय कराळेे, पांडुरंग बराटे, ओम मोरे, रोहित शेलोकार, वेदिका दहीभाते, काजल आडे, अंशदा पोरे, साक्षी जाधव, श्रृती गौतम, सानिका काळे, कृतिका जोगदंड, पायल फुले आदी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही उपस्थित होते.