अमरावती : किडनीचा आजार झाल्यास संबंधित रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी किडनी (मूत्रपिंड) प्रत्यारोपण शस्त्रक्रियेशिवाय इतर कोणताही पर्याय नाही. आतापर्यंत आपण आईने मुलाला, वडिलांनी मुलाला किंवा बहिणीने भावाला किडनीदान केल्याचे प्रसंग ऐकले आहेत. परंतु स्थानिक विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) सासऱ्याने आपल्या जावयाला किडनीदान करून त्याचे प्राण वाचविल्याची घटना घडली. जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी ही २० वी शस्त्रक्रिया यशस्वी केली.
शरीरातील विष किंवा कचरा काढून टाकणे तसेच शरीरातील रक्तामधील अतिरिक्त द्रव पदार्थ बाहेर फेकण्याचे काम किडनी करत असते. त्यामुळे किडनी निकामी झालेल्या रुग्णाचे जगणे कठीण होते. अशा परिस्थितीमध्ये संबधित रुग्णाला डायलिसिस किंवा किडनी प्रत्यारोपणाशिवाय इतर कोणताही पर्याय राहत नाही. अशा या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संजीवनी ठरत आहे. जागतिक आरोग्यदिनी सासऱ्याने आपल्या किडनीच्या आजाराने त्रस्त जावयाला किडनी दान केली. सोपान मेंढे (वय ३४. रा. वडगाव मेंढे) असे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाचे नाव आहे. तर हरिश्चंद्र संगणे (वय ५६) असे किडनीदान करणाऱ्या सासऱ्याचे नाव आहे.
यांनी केली यशस्वी शस्त्रक्रीया
सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अविनाश चौधरी (नेपोलॉजिस्ट), डॉ.प्रणित काकडे, डॉ. हितेश गुल्हाने, डॉ. स्वप्नील मोलके, युरो सर्जन डॉ. राहुल पोटोडे, डॉ. विक्रम देशमुख, डॉ. राहुल घुले, डॉ. विशाल बाहेकर,डॉ, प्रतीक चिरडे, बधिरिकरण तज्ञ डॉ. प्रणित घोनमोडे , डॉ.रोहित हातगावकर, डॉ. नंदिनी देशपांडे, डॉ.बाळकृष्ण बागवाले, डॉ.राजेंद्र नेमाडे, डॉ. जफर अली, डॉ. रवी भूषण, डॉ.अभिजित दिवेकर, डॉ. माधवी कासदेकर, डॉ. नीलेश पाचबुधे, डॉ. अंजू दामोदर तसेच किडनी ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर डॉक्टर सोनाली चौधरी यांच्यासह इतर नर्सिंग स्टाफच्या मदतीने विसावी शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये रोज शेकडो रुग्ण हे डायलेसिसचे उपचार घेतात. आतापर्यंत हॉस्पीटलमध्ये विस किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रीया यशस्वी झाल्या. यात सासऱ्याने जवायाला किडनी दान करण्याची पहिलीच घटना आहे. तर २०२३-२४ या आर्थीक वर्षातील ही पहिली शस्त्रक्रिया आहे.
- डॉ. अमोल नरोटे, वैद्यकीय अधीक्षक, सुपर स्पेशालिटी.