- गजानन मोहोडअमरावती - यंदाच्या हंगामाला सुरुवात होत असताना केंद्र शासनाद्वारा हमीभाव जाहीर करण्यात आले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. अखेर यंदाच्या हमीभावाला मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार कापूस (लांब धागा) याला गतवर्षीच्या तुलनेत क्विंटलमागे ६४० रुपये, सोयाबीनमध्ये ३००, तर तुरीच्या हमीभावात ४०० रुपयांनी वाढ देण्यात आलेली आहे.
सन २०२३-२४ करिता खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये या वेळेस केंद्र शासनाने वाढ केलेली असली तरी उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा कुठे, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. निविष्ठांची दरवाढ झाल्याने उत्पादनखर्चात अधिक वाढ होत आहे. याशिवाय आपत्तीने हातातोंडचा घास घास हिरावला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी फारसे काही उरत नसल्याचे वास्तव आहे.
कृषिमूल्य आयोगाद्वारा एमएसपीबाबतची शिफारस केंद्र शासनाला करण्यात येत असते. यामध्ये शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल यामध्ये गृहीत धरण्यात आले आहे. याशिवाय बैलजोडी, ट्रॅक्टरद्वारे मशागत, भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीचे भाडे, बियाणे, खते, अवजारे यांवर होणारा खर्च, सिंचन शुल्क, शेतबांधणीवरील घसारा, खेळत्या भांडवलावरील व्याज, सिंचनासाठी लागणारे डिझेल, वीज व शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे श्रमाचे मोल समाविष्ट असतात.
सन २०२३-२४ करिता एमएसपी ज्वारी ३१८० (२१० रुपये वाढ),तूर ७००० (४००),सोयाबीन ४६०० (३००), कापूस (मध्यम धागा) ६६२० (५४०),कापूस (लांब धागा) ७०२० (६४०), मूग ८५५८ (८०३), उडीद ६९५० (३५०) असे सन २०२३-२४ करीता हमीभावाचे दर आहेत.