अमरावती - अमरावती जिल्ह्यात ११, १२ व १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी व वरूड तालुक्यातील संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. एक वर्षाच्या कालावधीत तीन वेळा अवकाळीमुळे संत्रा बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. गारपीट व वादळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील १५ हजार हेक्टर क्षेत्रातील संत्रा उत्पादकांचे २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज संत्राउत्पादक व जाणकार व्यक्त करीत आहेत.
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने चांदूर बाजार तालुक्यातील सुमारे ९ हजार, अचलपूरमध्ये ४ हजार, मोर्शी २ हजार ५०० व वरूड तालुक्यात १०० हेक्टरमधील संत्राबागांचे नुकसान झाल्याचा अंदाज संत्रा जाणकार वर्तवण्यात येत आहे. कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहे. चांदूर बाजार तालुक्यात आंबिया बहराचे सुमारे १२० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. अचलपूर तालुक्यात ५० कोटी तर मोर्शी तालुक्यात ३० कोटी रुपये, तर वरूड तालुक्यात १० कोटी रुपयांपर्यंत संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने अद्याप संत्रा बागायतदारांच्या नुकसानाची आकडेवारी जाहीर केली नाही.
जिल्ह्यात ८७ हजार हेक्टर क्षेत्रात संत्राबागा आहेत. त्यापैकी ५५ हजार हेक्टरमधील संत्राबागा उत्पादनक्षम आहेत. यात ३५ हजार हेक्टर क्षेत्रात मृग बहर घेतला जातो, तर २० हजार हेक्टर क्षेत्रात आंबिया बहरातून उत्पादन घेतले जाते. यंदा मृग बहर अत्यल्प आला, तर आंबिया बहराची फळे मोठ्या प्रमाणात गळल्याने ११०० कोटीचे नुकसान झाले होते.
मृग बहराच्या फुटीला अवरोध वरूड व मोर्शी तालुक्यात २८ मे २०१७ रोजी आलेल्या अवेळी पावसामुळे मृग बहर फुटीचे प्रमाण केवळ १० टक्क्यांपर्यंतच राहिले. अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने आंबिया बहराची मोठी गळती झाली. ७ डिसेंबर २०१७ ला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी संयुक्त पंचनाम्याचे आदेश दिलेत. यामध्ये जिल्ह्यातील ११३६ गावांमधील ५९ हजार ९५६ शेतक-यांच्या ५३ हजार ६१२ हेक्टरमधील आंबिया बहराचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. याची मदत अद्याप मिळायची आहे.
चांदूर बाजार तालुक्यात १२० कोटी रुपयांचे नुकसान गारपिटीने तालुक्यातील २० हजार ५५८ शेतकरी गारद झाले असून, आंबिया बहराचे सरासरी अंदाजे ९० कोटींचे आर्थिक नुकसान त्यांना झेलावे लागत आहे. मृग बहरालाही गारपिटीची झळ पोहोचल्याने त्याचे उत्पादन घेणाºया शेतकºयांना अंदाजे ३० कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.