-जितेंद्र दखने अमरावती - शासनाने घरकुल योजनेच्या माध्यमातून मंजूर घरकुल लाभार्थ्याना योजनेचा लाभ देवूनही ग्रामीण भागात घरकुलाची पेंडन्सी मोठया प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपूर्ण असलेली घरकुलाची कामे तातडीने सुरू करण्यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी कडक पावले उचलत आपल्या अधिनस्त असलेल्या १४ विभागाच्या प्रमुखांना या ठिकाणी स्पॉट व्हिजीट करण्याचे निर्देश दिले होते. या भेटीदरम्यान प्रत्यक्ष लाभार्थ्याशी भेटून बंद असलेले घरकुलाचे कामे तातडीने सुरू करण्यासाठी प्रवृत्त करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या विभाग प्रमुखांनी २८ ग्रामपंचायतीमधील विविध गावांत स्पॉट व्हिजीट करत घरकुलाचे कामाची पाहणी केलेली आहे.
जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजूरी नंतर लाभार्थ्याना चार टप्यात घरकुलाचा निधी दिल्या जातो. केंद्र पुरस्कृत आवास योजनेंतर्गत सन २०१६ ते २०२२ या कालावधीत मंजूर केलेल्या घरकुलाचे लाभार्थ्याना पहिला हप्ता वितरीत केला. मात्र, घरकुल बांधकामास सुरुवात न केल्याने दुसरा व तिसरा हप्ता वितरीत केला नाही. घरकुल बांधकामात जिल्हा राज्यस्तरावर माघारल्याने शासनाने याची दखल घेत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन ग्रामपंचायती प्रमाणे एकूण २८ ग्रामपंचायतींमध्ये अर्धवट घरांच्या स्पॉट व्हिजीट साठी निवडले होते. यासाठी झेडपीच्या १४ खातेप्रमुखांना जबाबदारी सोपविली होती. सीईओंनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे या अधिकारी मागील आठवडयातच २८ ग्रामपंचायतीत स्पॉट व्हिजीट केली आहे. या दरम्यान, येथील पहिल्या हप्त्यानंतर घरकुल न बांधण्याचे कारण तसेच संबंधित लाभार्थ्याशी अडचणी काय यावर प्रत्यक्ष संवाद साधून याची माहिती जाणून घेतली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या या भेटीचा अहवाल मुख्यकार्यकारी अधिकारी यांचेकडे सादर केला आहे.यावर आता पुढील कारवाईबाबत दिशा ठरणार आहे. या ग्रामपंचायतींचा दिल्या भेटीभातकुली तालुक्यातील पूर्णानगर, खारतळेगाव, धामणगाव रेल्वे मधील मंगरुळ दस्तगीर, विरुळ राधे, अमरावती तालुक्यातील वलगाव, यावली, वरूड तालुक्यातील मांगरोळी, जरूड, अचलपूर मधील शिंदी बु., पथ्रोट, धारणीतील हरिसाल, रंगुबेली, चिखलदरातील रायपूर, चिखली, अंजनगाव सुर्जी मधील चौसाळा, कापुसतळणी, नांदगाव खंडेश्वरमधील खानापूर, दाभा, चांदूरबाजारमधील विश्रोळी, सोनोरी, चांदूर रेल्वेमधील घुईखेड, राजुरा, मोशातील अंबाडा, नरपिंगळाई, तिवसामधील शिरजगाव मोझरी, तळेगाव दशासर.