अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहातून २८ जून रोजी पहाटे तीन कैद्यांनी पलायन केल्याप्रकरणी गुरुवारपासून चौकशी प्रारंभ झाली आहे. चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे यांच्या नेतृत्वात गोपनीय विभागाच्या चमूने याप्रकरणी आवश्यक ती कार्यवाही सुरू केली आहे.
राज्याच्या कारागृह प्रशासन (नागपूर विभाग) उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या आदेशानुसार चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार समिती प्रमुख वैभव आगे हे गुरुवारी अमरावतीत सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास कारागृहात दाखल झाले. प्रारंभी चंद्रपूर येथील गोपनीय विभागाने बराक क्रमांक १२ येथे घटनेच्या दिवशी सुरक्षा रक्षक, रात्र पहारेकरी व अन्य कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. दरम्यान, चंद्रपूर जिल्हा कारागृहाचे अधीक्षक वैभव आगे, अमरावती कारागृहाचे प्रभारी अधीक्षक कमलाकर मिराशे व चमूने घटनास्थळाची पाहणी केली. एकंदरीत चौकशी समितीकडून पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न होत आहे.
अमरावती कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बयाणदेखील नोंदविण्यात आले आहे. पलायन करणाऱ्या तीन कैद्यांची हिस्ट्री तपासली जात आहे. तसेच बराक क्रमांक १२ मधील काही कैद्यांसाेबतही चौकशी समितीने संवाद साधल्याची माहिती आहे. पलायन करण्यापूर्वी तीनही कैद्यांच्या बराकीतील हालचाली आणि कुलूप तोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची जुळवाजुळव करण्यात येत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. प्रकरणाच्या चौकशीबाबत चंद्रपूरचे जिल्हा कारागृह अधीक्षक वैभव आगे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ‘नो कॉमेंटस’ असे म्हणत बोलणे टाळले.