अमरावती : उच्चशिक्षण विभागाच्या अमरावती विभागाचे सहसंचालक डॉ. मुरलीधर वाडेकर (४६, रा. विद्युतनगर, अमरावती) यांना ३० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दुपारी ३.११ ते ३.४५ च्या सुमारास ही कारवाई केली. पंचांसमक्ष वाडेकर यांच्या घराची झडती घेतली असता ३६ लाख ८२ हजार रुपये रोख, तर दहा लाख रुपयांचे सोने, असा ४६ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या पाच जिल्ह्यांतील महाविद्यालयांचे प्रतिनिधित्व करणारे ‘जॉइंट डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन’ कार्यालयाचे प्रमुख असलेले डॉ. मुरलीधर वाडेकर हे ३० हजार रुपये लाच मागत असल्याची तक्रार एका सहयोगी प्राध्यापकाने २९ जून रोजी एसीबीकडे केली.
तक्रारकर्त्याची मुलाखत झाल्यानंतर सहयोगी प्राध्यापक या पदासाठी वेतननिश्चिती, सेवापुस्तिकावर नोंद व सहयोगी प्राध्यापक या पदासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वाडेकर लाच मागत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पडताळणी करण्यात आली.
वाडकर यांनी ३० जून रोजी पंचासमक्ष ती लाचेची रक्कम घेतली. त्यावेळी वाडेकर यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एसीबीचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक देवीदास घेवारे, पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांनी ही कारवाई केली.