अमरावती : कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माेर्चेबांधणी चालविली आहे. त्यानुसार राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघनिहाय कॉंग्रेसने २ व ३ जून रोजी आढावा घेतला. यात अमरावती लोकसभा मतदार संघ अगोदर कॉंग्रेसच्या ताब्यात घ्या, अशी एकमुखी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली आहे. त्याकरिता राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा आमदार ॲड. यशोमती ठाकूर या आघाडीवर होत्या, अशी माहिती आहे.
अमरावती लोकसभा मतदार संघ कॉंग्रेसने का ताब्यात घ्यावा, याची चिकित्सक मांडणी आ. यशोमती ठाकूर यांनी प्रदेश कॉंग्रेसकडे केली. कॉंग्रेसकडे अनुसूचित जातीचा समक्ष आणि चांगला चेहरा आहे. कॉंग्रेसकडे तीन आमदार आणि बाजार समिती निवडणुकीत विजयाचा दाखला देण्यात आला. तसेच जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत आणि महापालिकेत कॉंग्रेसची ताकद अधिक आहे. त्या तुुलनेत शिवसेना वा राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही, ही बाब जिल्ह्यातील कॉंग्रेस नेत्यांनी वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. भाजपाच्या धर्मांध राजकारणाला केवळ कॉंग्रेसचा उमेदवारच सडेतोड उत्तर देऊ शकतो, असे अनेक उदाहरणानिशी पटवून दिले.
यावेळी आमदार ॲड. यशेामती ठाकूर, आ. बळवंत वानखडे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, मिलिंद चिमोटे, भय्या पवार, दिलीप एडतकर, किशोर बोरकर, डॉ. अंजली ठाकरे, नीलेश गुहे, संकेत कुलट, पंकज मोरे आदी उपस्थित होते.