- जितेंद्र दखने अमरावती : अमरावती ते पुणे मार्गावर खासगी बसला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. जवळपास सर्वच ट्रॅव्हल्समध्ये रोज प्रवासी गर्दी करत असल्याने ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे आकारून लूट करत असतात. दसरा अन् दिवाळीचा सण जवळ असल्याने या काळात हा प्रकार जास्त होतो. हा सर्व प्रकार लक्षात घेऊन एसटीने या ३० सीटर स्लिपर कोच प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती विभागात आठ नवीन 'स्लीपर'कोच बसेसच्या मागणीचा प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयाकडे सादर केलेला आहे.
आजघडीला पुणे, नागपूर आदी विभागांत या गाड्या दाखल झाल्या आहेत; मात्र अमरावती विभागाला नवीन स्लीपर कोच गाड्यांची सणासुदीचे दिवस तोंडावर असताना प्रतीक्षा आहे. पुण्यात वास्तव्याला असलेल्या अमरावती आणि विदर्भातील लोकांची संख्या मोठी आहे. दरवर्षी दिवाळीत आपल्या गावाकडे यायचे असेल तर रेल्वेचे आरक्षण मिळत नाही. विमानाचे भाडे प्रचंड असते आणि ट्रॅव्हल्सचे दरही आभाळाला भिडलेले असतात. अशीच स्थिती दिवाळी संपल्यावर अमरावतीवरून पुण्याला परत जाताना असते. ज्यांना हे परवडत नाही त्यांना नाईलाजाने घरी येण्याचा बेत रद्द करावा लागत असतो; मात्र आता एसटीनेच स्लीपर कोच बसेस प्रवासी वाहतूक सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे.
यानुसार ३० सीटर स्लीपर कोच गाड्या पुण्याच्या दापोडी येथील कार्यशाळेत बांधणी केली जात आहे. नव्याने दाखल होणाऱ्या या गाड्यांमध्ये यात ३० कोच असून, चार्जिंग पॉइंट, पाण्याची बाटली ठेवण्याची सुविधा आहे. प्रवाशांना लक्झरीचा फिल देणाऱ्या या आठ नव्या कोचच्या बसेस अमरावती-पुणे मार्गावर चालविल्या जाणार आहेत. याकरिता विभाग नियंत्रक कार्यालयाने नवीन ८ स्लीपर कोच गाड्यांची मागणी मध्यवर्ती कार्यालयाकडे केलेली आहे. पुणे, नागपूर या विभागात स्लीपर कोच गाड्या दाखल झालेल्या आहेत; मात्र अद्यापही अमरावती विभागात या नवीन गाड्यांची प्रतीक्षा लागली आहे.