श्यामकांत सहस्रभोजने
असाईनमेंट
बडनेरा : जुना बायपास मार्गावरील अमरावती एमआयडीसीत ठोस उद्योग नसल्याने रोजगार निर्मितीचा मोठा जिल्ह्यातील तरुणांना भेडसावत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत येथे मोठे उद्योग नसल्याने येथील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीच्या शोधात मुंबई, पुण्याचाच रस्ता धरावा लागतो. येथे मोठे उद्योग उभारले पाहिजे, ज्यामुळे बेरोजगारीचा मुद्दा मार्गी लागेल.
तरुणांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने एक ऑगस्ट १९६२ मध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ उभारण्यात आले. उद्योगांच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे हा यामागील हेतू आहे. अमरावती शहरालगतच जुना बायपास मार्गावर ४३ वर्षांपूर्वी अमरावती एमआयडीसीला सुरुवात झाली. हळूहळू उद्योग सुरू झाले. शहर व जिल्ह्याचा वाढता व्याप लक्षात घेता येथे बोटावर मोजण्या इतकेच मोठे उद्योग राहिले. बऱ्याच उद्योजकांनी जागा घेऊन बांधकाम केले. मात्र, मालाची निर्मिती केली नाही. या एमआयडीसीत दालमिल, ऑइलमिल, साबणाचे कारखाने, जिनिंग अँड इंजिनिअरिंग वस्तू निर्मिती, प्लास्टिकसह इतरही वस्तूंच्या निर्मितीचे कारखाने आहेत. मात्र, खूप लोकांना यापासून रोजगार मिळेल, असे चित्र नाही. नागपूरनंतर विदर्भात अमरावती शहराचे महत्त्व दूरपर्यंत आहे. त्या तुलनेत येथील एमआयडीसी सक्षम स्थितीत नाही. अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र नांदगाव पेठ येथे काही टेक्स्टाईल्सचे उद्योग उभारले आहे. त्यातून बऱ्यापैकी बेरोजगारांना रोजगाराची निर्मिती झाली आहे. मात्र त्यापासून जिल्ह्यातील तरुण खूप काही समाधानी नाहीत.
बॉक्स
बरेच उद्योग बंद अवस्थेत
जुना बायपास मार्गावरील एमआयडीसीत ४०६ उद्योजकांनी उद्योग उभारले होते. त्यापैकी सद्यस्थितीत ८० उद्योग बंद पडले आहेत. तसेच नांदगाव पेठ एमआयडीसीत ११३ पैकी ३५ उद्योग बंद झालेले आहेत. उद्योग का बंद पडलेत, याची कारणमीमांसा झाली पाहिजे. जिल्ह्यातील तरुणांसाठी एमायडीसी हा रोजगार निर्मितीचा आत्मा आहे. त्याकडे लोकप्रतिनिधी, प्रशासनिक अधिकारी तसेच उद्योजकांनी विशेष करून लक्ष दिले पाहिजे. उद्योग बंद पडण्याऐवजी वाढले पाहिजे. ज्यामुळे बेरोजगारांची संख्या कमी होईल.
------------------------------
बॉक्स
उद्योगाला बळ द्या, भरमसाठ जागा उपलब्ध
अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र नांदगाव पेठ येथे उद्योग उभारण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या प्रमाणात तेथे जेमतेम उद्योग आहेत. तसेच जुना बायपास मार्गावर उद्योगांसाठी जागेचे क्षेत्रफळ कमी आहे. अमरावती शहर व जिल्ह्याची लोकसंख्या मोठी आहे. मोठे उद्योग उभारणीसाठी शासन प्रशासनिक स्तरावर अधिक प्रयत्न झाल्यास याठिकाणच्या शिक्षित तरुणांना आपल्याच जिल्ह्यात नोकरी मिळेल शेकडो किलोमीटर घरापासून दूर जावे लागणार नाही. कुटुंबांना देखील मोठा दिलासा मिळेल.
-–-------------------------
प्रतिक्रिया
रोजगार मिळेल हे स्वप्नच!
प्रत्येक क्षेत्रात आता स्पर्धा सुरू झाली. नोकरीसाठी विदर्भातील तरुणांना मुंबई, पुणा, हैदराबाद, बेंगलोर यासारख्या मोठ्या शहरात जावे लागते. पगार कमी खर्च अधिक अशा विदारक परिस्थितीला तोंड द्यावे लागते. तेव्हा अमरावती एमआयडीसीत रोजगार निर्मितीवर भर दिला पाहिजे.
- आकाश वाठ,
बडनेरा
अमरावती जिल्ह्यात काही प्रमाणात मोठे उद्योग आहेत. मात्र, जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत पाहिजे तशी सक्षम व रोजगार उपलब्ध करणारी एमआयडीसी नसल्याने आजही येथील तरुणांना बाहेर गावचा रस्ता पकडावा लागतो. उद्योगांना बळ दिले पाहिजे.
- अमर यादव,
वडद
सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळत नाही रोजगाराच्या शोधात वणवण फिरावे लागते कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे. हा प्रश्न अनेक तरुणांना भेडसावणारा झाला आहे. जिल्ह्यातल्या एमआयडीसीत मोठे उद्योग उभारले पाहिजे, ज्यामुळे रोजगार निर्मिती होईल.
-विश्वास लसनकार
बडनेरा.
--------------------------------
* अमरावती व नांदगाव पेठ एमआयडीसी
जमीन अधिग्रहित-
1)अमरावती औद्योगिक क्षेत्र-१७८.९५ हेक्टर
2) अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र नांदगाव पेठ- २८०९.७८ हेक्टर
--------------------------------
* 1976- 77 सालात सुरू
-------------------------------
* किती उद्योजकांना वाटप
1) अमरावती औद्योगिक क्षेत्र-४०६ उद्योग
2) अतिरिक्त अमरावती औद्योगिक क्षेत्र नांदगाव पेठ-८० उद्योग
-----------------------------------