अमरावती : अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात सांडपाणी साचत असल्याच्या माहितीवरून पाहणीसाठी आलेले महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर तीन महिलांनी अचानक धाव घेत शाई फेकली. कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या वाहनांचा टायर फोडण्याचा प्रयत्न केला आणि पेचकचने त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नदेखील केला. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी आयुक्तांच्या तक्रारीवरून पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले. याप्रकरणी आता आमदार रवी राणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रवी राणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. रवी राणा यांनी स्पष्टीकरण दिलं असून यामध्ये आपला कोणताही हात नसल्याचा दावा केला आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. माझ्यावर गुन्हे दाखल करुन रवी राणाला कोणत्यातरी गुन्ह्यात अडकवलं पाहिजे असा इशारा उद्धव ठाकरेंनी अमरावतीमधील पोलीस आयुक्तांना दिला आहे, असा दावा रणी राणा यांनी केली आहे.
रवी राणा पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे डीजीदेखील यात सहभागी आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या विषयावर कोणी काही बोललं तर त्याला अडकवायचं, फसवायचं, अटक करायची असा प्रकार सुरु आहे. महाराष्ट्रात गेलो तर अटक करुन जेलमध्ये टाकतील, असे मला पोलिसांचे फोन येत आहेत, असा दावा रवी राणा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मी कुठे फरार नसून अमरावतीत जाणार आहे. माझ्याविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले असतील तर मी सामोरं जाणार, असंही रणी राणा यांनी म्हटलं आहे.
१० जणांविरुद्ध गुन्हे दाखल; पाच जण ताब्यात-
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या तक्रारीनुसार राजापेठ पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हे नोंदविले आहे. यात अजय बोबडे, सूरज मिश्रा, संदीप गुल्हाने, महेश मुलचंदानी, विनोद येवतीकर यांना ताब्यात घेतले आहे. कमलकिशोर मालाणी यांची प्रकृती बिघडल्याने ते रुग्णालयात उपचार घेत आहे. तीन महिला व एक पुरुष असे चार जण पसार आहेत. याप्रकरणी भादंविच्या ३०७, ३५३, १२० (ब), १४३, १४७, १४८, १४९ व आयटी ॲक्टनुसार ५०१, ५०२ अन्वये गुन्हे नोंदविले आहे.
स्क्रू ड्रायव्हरनेही हल्ला-
आमदार रवि राणा येणार असल्याचे कमलकिशोर मालानी यांनी सांगितल्यानेच तेथे गेलो होतो. या व्यक्तींनी माझ्या शासकीय वाहनांची दोन चाके स्क्रू ड्रायव्हरने फोडली व माझ्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चालकाने कशीतरी गाडी घरापर्यंत आणली. या धक्काबुक्कीत माझ्या शर्टाची दोन बटने तुटली. नैतिक खच्चीकरणाचा हा प्रकार असल्याचे आयुक्तांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.