अमरावती, दि. 22 - एका महिलेनं 2 वर्षांच्या चिमुकलीसह बडनेरा रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाला असून महिला गंभीर जखमी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आराध्या राहुल मिश्रा (वय 2 वर्ष) असे मृत मुलीचे नाव आहे. तर पिंकी राहुल मिश्रा (वय 24 वर्ष) असे जखमी महिलेचं नाव आहे. पिंकीचा पती राहुल मिश्रा हे कल्याणीनगर येथे पॅथॉलॉजिस्ट होते. मानसिक आजाराला कंटाळून त्यांनी रविवारी(20 ऑगस्ट) गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
या पार्श्वभूमीवर पिंकीनंही प्रवासादरम्यान बडनेरा स्थानकात रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत गंभीर जखमी झाल्या आहेत मात्र त्यांची दोन वर्षांची मुलगी दगावली आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.