अमरावती - घरगुती वीज मीटरचे व्यावसायिकमध्ये रूपांतर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना महावितरणच्या मोर्शी ग्रामीण भाग-२ (वर्ग २) सहायक अभियंत्याला अटक करण्यात आली. १४ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोर्शी येथे ही कारवाई केली.
मोर्शी येथील प्रभात चौकातील रहिवासी ६३ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार, सहायक अभियंता अंकुश सूर्यभान ठाकरे याने तक्रारदाराच्या मालकीचे घरगुती वापराचे वीज मीटर हे व्यवसायिक वापराकरिता रूपांतरित करून देण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावरून पडताळणी करण्यात आली. त्यावेळी १५ हजार रुपये घेण्याची त्याने तयारी दर्शविली. अंकुश ठाकरे याने त्याच्या कक्षात लाचेची रक्कम तक्रारदाराकडून घेताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. लाचेच्या रकमेसह त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध मोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अमरावती परिक्षेत्र पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अप्पर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अमोल कडू, योगेशकुमार दंदे, कॉन्स्टेबल आशिष जांभोळे, शैलेश कडू, चालक उपनिरीक्षक सतीश किटुकले यांनी ही कारवाई केली.