लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : तब्बल १० महिन्यांनंतर सोमवार, २५ जानेवारीपासून सुरु होणारी अमरावती - मुंबई एक्सप्रेस ही विशेष गाडी ३० जानेवारीपर्यंत हाऊसफुल्ल असल्याची माहिती आहे. २२ जानेवारी रोजी आरक्षण सुरु होताच पहिल्या तीन तासांतच आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे ही गाडी रेल्वे प्रवाशांच्या पसंतीला आजही खरी उतरली आहे.
अमरावती - मुंबई एक्स्प्रेसला एकूण २२ डबे असून, यात प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीचे एकूण १० डबे वातानुकूलित आहेत. आठ डबे शयनयान (स्लिपर कोच) तर चार डबे सर्वसाधारण (जनरल) आहेत. परंतु, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरक्षण तिकिटांशिवाय या गाडीमधून प्रवास करता येणार नाही, असे रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे. जनरल डब्यांमध्येही प्रवासासाठी आरक्षण घ्यावे लागणार आहे. मुंबई, दादर, ठाणे, कल्याण, ईगतपुरी, नाशिक, जळगाव, भुसावळ, मलकापूर, मनमाड, नांदुरा, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडेनरा व अमरावती रेल्वे स्थानकादरम्यान आरक्षण हाऊसफुल्ल आहे. ही गाडी मुंबईकडे सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी रवाना होणार आहे.
कोरोना नियमावलीचे पालन करूनच या गाडीतून प्रवास करावा लागणार असल्याचे मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक शरद सयाम यांनी सांगितले.