अमरावती : राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा यांनी शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. हा पुतळा महापालिकेनं हटवला आहे. यानंतर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले असून खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आमदार रवी राणा यांनी हा पुतळा विनापरवानगी बसवला होता. तो आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला. काल रात्री राजापेठ उड्डाणपुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आणि त्यानंतर हा पुतळा हटविण्यात आला. हा पुतळा महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने काढला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. त्यामुळे बरेच राजकारण रंगले होते.
अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी, अशी मागणी रवी राणा यांनी २ दिवसांपूर्वी महापालिकेत केली होती. मात्र, आज पहाटेच पुतळा हटवल्याने जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले आहे. तर, यात शिवप्रतिष्ठानने सुद्धा उडी घेतल्याचे समजते. सध्या आमदार रवी राणा यांच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त असून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
या प्रकरणानंतर, अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावर तसेच राणा दाम्पत्याच्या घरासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानंतर राणा समर्थक आणि मनसे आक्रमक होण्याची शक्यता आहे.