अमरावती : नियमाला अनुसरून राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांसह छत्री तलाव परिसरात शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणी प्रस्तावाला महापालिकेने हिरवा झेंडा दिला आहे.
राजापेठ उड्डाणपुलावर नियमानुसार पुतळा उभारता येत असेल, तर ती संपूर्ण प्रक्रिया महापालिकेने करावी तसेच दोन्ही ठिकाणच्या पुतळा उभारणीसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी, असे निर्देश पीठासीन सभापती तथा महापौर चेतन गावंडे यांनी दिले.
दोन्ही ठिकाणच्या पुतळा उभारणीसाठी ज्या-ज्या परवानग्या आवश्यक आहेत, ना हरकत हव्या असतील, त्यासाठी जिल्हा प्रशासन, कला महासंचालनालय व संबंधित सर्व विभागांशी समन्वय साधण्याचे निर्देश सभागृहात देण्यात आले. बसपचे गटनेता चेतन पवार व भाजपचे सुनील काळे यांनी गुरुवारी महापालिकेच्या आमसभेदरम्यान राजापेठ उड्डाणपुलावर पुतळा उभारणीचा प्रस्ताव सभागृहासमोर आणला.
सनदशीर मार्गाचा अवलंब करून संपूर्ण प्रशासकीय प्रक्रिया करून महापालिकेने तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, अशी आग्रही मागणी पवार यांनी केली. तर तेथे शिवाजी महाराजांसोबतच संभाजी महाराजांचादेखील पुतळा बसवावा, अशी मागणी सुनील काळे यांनी केली. तत्पूर्वी छत्री तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यालादेखील सभागृहाने सर्वसहमतीने मान्यता दिली. तुषार भारतीय, विलास इंगोले यांनीही समर्थनार्थ भूमिका घेतली.
राजापेठ उड्डाणपुलावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी व छत्री तलाव परिसरात महाराजांचे भव्य स्मारक उभारणीचा प्रस्ताव आणून तो सभागृहात मंजूर केल्याबाबत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महापौर चेतन गावंडे यांचे अभिनंदन. ठरावाला पाठिंबा देणाऱ्या संबंधित नगरसेवक व त्यासाठी राजीनामा देणाऱ्या युवा स्वाभिमानच्या नगरसेवकांचेदेखील आभार.
रवी राणा, आमदार, बडनेरा