अमरावती : शहरातील जवाहर नवोदय विद्यालयाला पहिल्यांदाच ३१व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल संमेलन २०२३चे आयोजन करण्याचा बहुमान मिळाला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन २८ ऑगस्टला होणार असून, ३० ऑगस्टला या स्पर्धेचा समारोप होणार आहे. या स्पर्धेसाठी देशभरातील एकूण ५७६ खेळाडू तसेच ६४ इस्कॉर्ट्स सहभागी होणार असल्याची माहिती जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य ससिंदरन सी. के. आणि विभागीय क्रीडा उपसंचालक विजयकुमार संतान यांनी दिली.
जिल्ह्यात ३१ राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा अमरावती जिल्ह्यामध्ये प्रथमच होत आहे. या स्पर्धेमध्ये आठ विभागांतील म्हणजेच देशातील भोपाल, चंडीगड, हैदराबाद, जयपूर, लखनऊ, पटणा, पुणे व शिलांग या विभागांतील खेळाडू, इस्कॉर्ट्स व अधिकारी सहभागी होणार आहे. व्हॉलीबॉलच्या सर्व स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल येथील प्रशस्त कोट्स येथे होणार आहे. स्पर्धेचे सर्व मॅचेस लीग कम नॉकआऊट पद्धतीने होणार आहे. तसेच स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आयोजन समितीने केली आहे.
या स्पर्धेचे उद्धाटन सोमवार, दि. २८ ऑगस्टला सकाळी १० वाजता होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष जवाहर नवोदय विद्यालयाचे असिस्टंट कमिशनर व क्लस्टर इन्चार्ज पुणे डॉ. ए. एस. सावंत तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपस्थित राहणार आहे. तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठचे रजिस्ट्रार तुषार देशमुख, विभागीय शिक्षणाधिकारी प्रफुल्ल कचवे, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अनन्या रॉय उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्र परिषदेत देण्यात आली.