जितेंद्र दखने, अमरावती: जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया करण्यात आली आहे. दरम्यान, बदली प्रक्रियेच्या सहाव्या टप्प्यात प्रशासकीय बदल्या केल्या जाणार आहेत. यात दिव्यांग, विधवा तसेच ५३ वर्षांवरील शिक्षकांना अवघड क्षेत्रात (मेळघाटमध्ये) पदस्थापना देऊन या भागातील रिक्त जागा भरल्या आहेत. यात जिल्ह्यातील ३०६ शिक्षकांचा समावेश आहे. मात्र बदल्या झालेल्या २०६ हून अधिक शिक्षकांनी विविध कारणांचे दाखले देत आपली मेळघाटातील बदली रद्द करण्यासाठी शिक्षण विभागाकडे लेखी स्वरूपात अर्ज केले आहेत. त्यामुळे मेळघाटात जाण्यास ना म्हणणाऱ्या गुरुजींचा अजार्ची आता शिक्षण विभागाने पडताळणी सुरू केली आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या राज्यस्तरावरून आॅनलाइन बदल्या केलेल्या आहेत. यामध्ये बदली करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये दिव्यांग, ५३ वर्षांवरील, सेवानिवृत्त होण्याच्या वाटेवर असलेल्या शिक्षकांसह ज्यांनी आजपर्यंत मेळघाटात सेवाच बजावली नाही, अशा शिक्षकांना मेळघाट (अवघड क्षेत्र) पदस्थापना दिली आहे. मात्र या बदल्यांमध्ये मोठी अनियमितता झाली असून, चुकीच्या पद्धतीने बदल्या केल्याचा आक्षेप बदली झालेल्या शिक्षकांनी केला आहे. या बदल्या कशा चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि आमच्या अन्याय कसा झाला याबाबत या गुरुजींनी बदलीवर हरकती, आक्षेप घेत लेखी स्पष्टीकरण सीईओंकडे शिक्षण विभागाचे माध्यमातून केलेले आहे. शिक्षण विभागाकडे याबाबतचे २०६ हून लेखी अर्ज प्राप्त झाले आहेत. या अजार्नुसार मेळघाटात झालेली बदली रद्द करण्यासाठी विविध कारणे नोंदविले आहेत. त्यामुळे आता प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे या शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
मी मेळघाटात गेलो होतो
जिल्हा परिषद शिक्षण विभागात शिक्षक पदावर रुजू झालो, त्यावेळी माझी सेवा मेळघाटात झालेली आहे. आता ५३ वर्षं वय झालं आहे. त्यामुळे ऑनलाइन बदल्यांमध्ये प्रशासकीय कारणावरून मेळघाटात झालेली बदली रद्द करावी.
माझी बायपास सर्जरी झाली
बदली प्रक्रिया २०२२ मध्ये झालेल्या प्रशासकीय बदलीत महिला शिक्षकांचा समावेश आहे. यात काहींनी आपल्या बदलीवरील आक्षेपात मी सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहे. २०१९ मध्ये बायपास सर्जरी झालेली आहे. यापूर्वी मेळघाटातील दुर्गम क्षेत्रात सेवा दिलेली आहे. विशेष म्हणजे सहायक शिक्षक नियुक्त करताना पेसा अंतर्गत बदली करण्यात येईल, अशी सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे अन्याय दूर करून बदली यादीतील नाव वगळण्यात यावे.
गत जूनमध्ये ५३ वर्षं वय झालं
शासनाचे बदली धोरणानुसार माझी सेवा मेळघाट झालेली आहे. बदली प्रक्रिया ही मार्चमध्ये राबविली आहे. परंतु माझे वय जून २०२२ मध्ये ५३ वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळे प्रशासकीय बदलीमध्ये मेळघाटात केलेले स्थानांतरण रद्द करण्यात यावे.
शिक्षकांच्या ऑनलाइन प्रशासकीय बदल्यांमध्ये ३०६ शिक्षकांना मेळाघाटात बदल्या केलेल्या आहेत. त्यामुळे या शिक्षकांनी अन्यायकारक व चुकीच्या पद्धतीने बदल्या झाल्याचे लेखी आक्षेप, हरकती तक्रार निवारण कक्षाकडे सादर केल्या आहेत. या तक्रारीची पडताळणी केली जात आहे. यावर सीईओंच्या मार्गदर्शनात पुढील निर्णय होईल. -प्रिया देशमुख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)