जितेंद्र दखने, अमरावती : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून गत फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यंदा अमरावती जिल्ह्याचा टक्का घसरला आहे. शहर व ग्रामीणचे जिल्ह्यातील ८६९ जण शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आहेत. पाचवी आठवी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे शिक्षण विभागाकडून दाखविले जात असले तरी प्रत्यक्षात त्याचे परिणाम मात्र, त्या पद्धतीचे दिसत नसल्याने आता शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. जिल्ह्यात पाचवीचे १८.०५ टक्के तर आठवीचे अवघे ८.६० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर ८६९ एवढी शिष्यवृत्तीधारक ठरलेल्यांची संख्या आहे.
जिल्हाभरातील विविध शाळांमधील १० हजार ३९९ विद्यार्थ्यांनी पाचवीची तर ९ हजार २९३ विद्यार्थ्यांनी आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल आणि गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली आहे, यामध्ये निकाल पाहून सुमार कामगिरी झाल्याचा प्रत्यय प्रकर्षाने दिसून येतो. पाचवीचे १० हजार ३९९ पैकी परीक्षार्थीपैकी १८७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात केवळ ५१० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. या निकालाची टक्केवारी १८.०५ एवढीच आहे. तर आठवीचे ९ हजार २९३ पैकी केवळ ७९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ३५९ जणच शिष्यवृत्तीला पात्र ठरले आहेत. असे दोन्ही मिळून केवळ ८६९ शिष्यवृत्तीधारकांची संख्या आहे. विशेष म्हणजे १५ तालुक्यांचा निकाल पाहिला तर पाचवी व आठवीचा निकाल हा केवळ १० ते ३० टक्क्याच्यां आताच लागला आहे. काही तालुक्याचा निकाल तर पाच टक्केही लागला नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेतील निकालात जिल्हा मागे पडल्याने या सुधारणा व्हावी यादृष्टीकोनातून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा असाच परफॉर्मन्स पुढील वर्षी दिसला तर यात आश्चर्य वाटू नये, हे विशेष.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या माध्यमातून भातकुली पंचायत समिती तज्ज्ञाच्या माध्यमातून अतिरिक्त वर्ग घेऊन शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी परीक्षा घेतली होती. त्यामुळे या पंचायत समितीचा यंदा निकाल चांगला लागला आहे. मात्र इतर तालुक्यात मागे असले तरी पुढील वर्षी भातकुली सारखा पॅटर्न सर्व तालुक्यात राबवून निकालाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयन्न करू. बुद्धभूषण सोनवने, शिक्षणाधिकारी प्राथमिक.