अमरावती : पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने गुरूवारी शहर कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील वसंत चौक, बडनेरा हद्दीतील आठवडी बाजार व फ्रेजरपुरा हद्दीतील चपराशीपुरा येथे सुरू असलेल्या जुगारावरधाड टाकली. या कारवाईत १६ जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ५५ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, वसंत चाैक व चपराशीपुरा येथे जुगार चालविणारे अनुक्रमे आलोक श्रीवास व रियाज खान हयात खान हे पथकाच्या हाती सापडले नाहीत. त्यांच्याविरूध्द गुन्हा देखील दाखल करण्यात आला नाही.
स्थानिक वसंत चौक येथे आलोक श्रीवास याने जुगार भरविल्याची माहिती गस्तीवर असलेल्या विशेष पथकाला मिळाली. त्या आधारावर पथकाने तेथील जुगारावर धाड टाकली. या कारवाईत अर्शद खान नासीर खान (१९, रा. यास्मीननगर), रोहीत संतोष लोहकरे (२५, रा. यशोदानगर), राहुल लक्ष्मण लोणारे (२८, रा. बेलपुरा), जयप्रकाश विजय शर्मा (३८, रा. शोभानगर), विलास भाष्करराव बोरकर (४२, रा. गोपालनगर), मौसीन शाहा युसूफ शाहा (३३, रा. ताजनगर) व वचन कृष्णराव माहुरकर (४२, रा. गायत्रीनगर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाऱ्यांविरुद्ध कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोबतच पथकाने बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील आठवडी बाजार येथील जुगारावर धाड टाकली. या कारवाईत हिरा रामाजी रोकडे (५०, रा. नवीवस्ती, बडनेरा), फइमोद्दीन इस्लामोद्दिन (५०, रा. मोबीनपुरा, बडनेरा), शेख लतिफ शेख नासीर (३८, रा. आठवडी बाजार, बडनेरा), ज्ञानेश्वर अन्नाजी तिडके (५५, रा. टिमटाला) व शेख इमरान शेख इब्राहीम (२२, रा. इंदिरानगर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाऱ्यांविरुद्ध बडनेरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.जुगार कुणाचा ते ज्ञात, ‘तो’ गायब
चपराशीपुरा परिसरातील शुक्रवार बाजारात रियाज खान हयात खान हा जुगार खेळवत असल्याची माहिती विशेष पथकाने मिळाली. त्याआधारे १८ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० च्या आसपास तेथे धाड टाकण्यात आली. मात्र रियाजखान पोलिसांच्या हाती आला नाही. या कारवाईत मनोहर प्यारेलाल गौर (६२) रा. परतवाडा, सुनील नंदकिशोर गोदली (३२, रा. चपराशीपुरा), जगन बबन सरकटे (३४, रा. परिहारपुरा) व राहुल दिवाकर बोके (४१, रा. रुक्मिणीनगर) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २० हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जुगाऱ्यांविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू यांच्या नेतृत्वात करण्यात आली.