अमरावती : राजस्थानातून हैदराबादकडे जाणारे ५८ उंट अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या उंटाची कत्तलीसाठी तस्करी (camels smuggle) होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या उंटांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
राज्यस्थानहुन हैदराबादच्या दिशेने निघालेल्या ५८ उंटाची तस्करी होत असल्याची तक्रार हैदराबाद येथील प्राणीमित्राने केली होती. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातून जात असलेले ५८ उंट तक्रारीवरुन ताब्यात घेतले आहे. प्राण्यांना इतकी मोठी चाल देणे सोबतच निर्दयी वागणूक देणे म्हणजे निर्दयीपणाचा कळस गाठणे आहे, कत्तलीसाठी तस्करीचा आरोप प्राणीमित्र जसराज श्रीमाळ यांनी तक्रारीत केले होते. त्यामुळे पोलिसांनी या संदर्भात गुन्हे दाखल केले आहे.
दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे प्राणी मित्र संघटनेने तक्रार केली. त्यानंतर नवनीत राणा यांनी तातडीने पोलिसांनी माहिती दिली व उंटांचा जीव वाचू शकला. हे उंट राज्यस्थानमधून १२०० किलोमीटर पायदळ हैदराबादमध्ये कत्तलीसाठी जात असल्याची माहिती नवनीत राणा यांनी दिली. तर देशात उंट तस्करीच मोठं रॅकेट या निमित्ताने उघडकीस येऊ शकतं असंही त्या म्हणाल्या.