अमरावतीत एका मुलीला पळवून आंतरधर्मीय विवाह केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर वातावरण चांगलच तापलं होतं. या प्रकरणावरून खासदार नवनीत राणा यांच्यासह हिंदू संघटना आक्रमक झाल्या होत्या. अमरावतीच्या पोलीस ठाण्यात खासदार राणा आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. तेथे कॉल रेकॉर्डिंगवरून त्यांची पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्याशी तू तू मै मै झाली. घरातून बेपत्ता झालेली मुलगी लव्ह जिहाद प्रकरणात अडकली असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी बाचाबाची करत जोरदार राडा घातला होता. संबंधित मुलगी सापडली असून ती घरगुती कारणातून एकटीच घरातून निघून गेल्याचं स्पष्ट झालं आहे. यानंतर पोलीस पत्नी वर्षा भोईर यांनी नवनीत राणा यांच्यावर संताप व्यक्त करत त्यांचा एकेरी उल्लेखही केला.
पोलीस पत्नी वर्षा भोईर यांनी नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत संताप व्यक्त केला. “जोपर्यंत तुमझ्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोवर मी शांत बसणार नाही. तू आमचा आत्मसन्मान दुखावला आहे. तू प्रत्येकाला बोलते, काही वैयक्तित दुष्मनी आहे का तुझी? ते जनप्रतिनीधी म्हणून काम करतात. आपल्या कर्तुत्वार मोठे होऊन इथवर आलेत. तुझ्यासारखं किराणा वाटून मतं घेऊन निवडून आले नाही. फक्त राजकारणाच्या तुझ्या तमाशासाठी अमरावतीला बदनान करून राहिली आहे. म्हणतेस अमरावती पोलिसांमुळे बदनाम झालीये, अमरावती पोलिसांमुळे नाही तुझ्यामुळे बदनाम झाली आहे,” असं म्हणत भोईर यांनी संताप व्यक्त केला.