अमरावती : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील १६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या उपस्थितीत या कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य सहायक व आरोग्य सेवक पुरुष-महिलांचा समावेश आहे.राज्याच्या आरोग्य विभागाच्या आदेशावरून जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात सध्या पदोन्नतीची प्रकरणे निकाली काढण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची पदोन्नतीची प्रक्रियादेखील रखडली होती. आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या प्रतीक्षा असताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी पुढाकर घेत आरोग्य विभागातील १६ कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली. यामध्ये चार आरोग्य सहायक आरोग्य पर्यवेक्षकपदी, तर आठ आरोग्यसेवकांना आरोग्य सहायक व चार पुरुष आरोग्य सेवकांनादेखील आरोग्य सहायक म्हणून पदोन्नती देण्यात आली.यावेळी जिल्हा परिषद सभागृहात सीईओ अविश्यांत पंडा व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्या उपस्थितीत या कर्मचाऱ्यांना समुपदेशनाने पदोन्नती व पदस्थापना देण्यात आली. यात एस.पी चुडे, आर.एल. बोमरे, शशिकला कासदेकर, एल.आर. फोडवते, माधुरी बोरवार, गुंफा राठोड, सुनंदा मेंढे, विमल राठोड, मंगला पडोळे, जे.बी. सुरजुसे, कल्पना मसाने, सुनीता पवार, जे. आर. सोनटक्के, बी.व्ही. कविश्वर, विवेक उमक, डी. एस. चौधरी या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
अमरावती : १६ आरोग्य सेवकांना आरोग्य सहाय्यक, पर्यवेक्षकपदावर प्रमोशन
By जितेंद्र दखने | Published: November 14, 2023 8:25 PM