अमरावती : शहरात गेल्या २४ तासांत पाच जणांचा मृत्यू झाला. पाचही प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. कुणी आत्महत्या केली, कुणाची भणंगावस्थेत अखेर झाली, कुत्रा मागे लागल्याने दुचाकी अनियंत्रित होऊन झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर एका ५२ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली.
येथील एक महिला लेप घेण्याकरिता एका आप्ताच्या दुचाकीवर जात असताना कुत्र्याने दुचाकीस्वाराचा पाय पकडल्याने दोघेही खाली कोसळले. २९ मे रोजी सकाळी ७ च्या सुमारास नांदगाव पेठ हद्दीत तो अपघात घडला होता. पैकी गंभीर जखमी झालेल्या त्या महिलेला आधी येथील कॉँग्रेसनगरस्थित रुग्णालयात तर पुढे तिला नागपूरला हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्या महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी ६ जून रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.
तर, जिल्हा सामान्य रुग्णालयात बेशुद्धावस्थेत आणलेल्या वैभव मेश्राम (२५, रा. अनगडनगर, शेगाव) याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी ६ जून रात्री ८.४५ च्या सुमारास आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. तर, साईनगर ते अकोली रेल्वे फाटकादरम्यान एकजण मृतावस्थेत आढळून आला. नयन धनराज वाघमारे (३५, बेलपुरा) अशी मृताची ओळख पटविण्यात आली. ६ जून रोजी दुपारी ४ च्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी ६ जून रात्री ११.४७ वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.
शेतकरी आढळला सांडपाण्याच्या नाल्यात
वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिराळा येथे दिलीप सखाराम हटवार (५२) या शेतकऱ्याचा मृतदेह गावातीलच सांडपाण्याच्या नाल्यात आढळून आला. ६ जून रोजी सकाळी ९ ते ११ च्या सुमारास ही घटना उघड झाली. माहितीवरून वलगाव पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सावरकर हे शिराळा येथे गेले असता, हटवार हे नाल्यात मृतावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. आपल्या काकांवर कर्ज होते. ते शेतीच्या नापिकीने त्रस्त होते, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी फिर्याद मृताच्या पुतण्याने दिली. सबब, वलगाव पोलिसांनी ६ जून रोजी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.
दारूत झाला शेवट
६ जून रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास बेलपुरा पुलाजवळील नाल्याच्या काठावर एक इसम मृतावस्थेत आढळला. मृताची ओळख गजानन रमेश फुके (५१, प्रल्हाद कॉलनी) अशी पटविण्यात आली. मृत व्यक्ती आपला भाऊ असून, तो नेहमी दारू पितो, कोठेही फिरतो, कोठेही राहतो, अशी माहिती मृताचा भाऊ प्रमोद फुके यांनी दिली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.