जितेंद्र दखने, अमरावती: भारतीय पशुवैद्यक परिषदेची निवडणूक ८ जून रोजी पार पडली. यामध्ये देशभरामधून ९३ उमेदवार रिंगणात होते. ६९ हजारांपैकी ३६ हजार मतदारांनी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीत आयव्हीए पॅनलचे सर्व ११ सदस्य विजयी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्यातून अमरावती येथील डॉ. संदीप इंगळे हे सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत.
दिल्ली स्थित भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या ११ सदस्य पदासाठी त्रैवार्षिक निवडणूक घेण्यात आली. यामध्ये आयव्हीए पॅनलचे डॉ. संदीप इंगळे (अमरावती, महाराष्ट्र), डॉ. उमेशचंद्र शर्मा (मध्य प्रदेश), डॉ. गीता प्रिया एल (आंध्र प्रदेश), डॉ. अमित नैन (पंजाब), डॉ. इंद्रजित सिंग (राजस्थान), डॉ. थलिंगा वेलू डी (तामिळनाडू), डॉ. सुशांत राज बी (कर्नाटक), डॉ. विजय कुमार (दिल्ली), डॉ. दंडेश्वर डेका (आसाम), डॉ. किरण अरविंद भाई (वसावा गुजरात), डॉ. गुरुचरण दत्ता (वेस्ट पश्चिम बंगाल), असे ११ सदस्य भारतीय पशुवैद्यक परिषदेवर निवडून आले आहेत.
यामध्ये ११ सदस्य निवडणुकीद्वारे, तर १६ सदस्य हे नामनिर्देशित असतात. असे एकूण २७ सदस्य या परिषदेवर प्रतिनिधित्व करतात. विशेष म्हणजे, महाराष्टातून अमरावतीचे डॉ. संदीप इंगळे हे या परिषदेवर सलग चौथ्यांदा विजयी झाल्याबद्दल पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय कावरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, डॉ. विजय राहाटे, डाॅ. श्रीराम कोल्हे, डॉ. तुषार गावंडे, डॉ. राजेश निचळ, डॉ. सुधीर जिरापुरे, डाॅ. महावेट व पशुसंवर्धन विभाग राजपत्रित अधिकाऱ्यांनी त्यांचा गौरव केला.
काय आहे भारतीय पशुवैद्यक परिषद?
भारतीय पशुवैद्यकीय परिषद (व्हीसीआय) ही भारतातील पशुवैद्यकीय शिक्षण आणि सरावावर देखरेख आणि नियमन करण्यासाठी स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. पशुवैद्यकीय अभ्यासक्रमासह पशुचिकित्सा व इतर सेवांचे नियमन करण्याचे महत्त्वपूर्ण काम पशुवैद्यक परिषदेच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे भारतीय पशुवैद्यक परिषदेला विशेष असे महत्त्व आहे.