अमरावती : शेतातील मोटरपंप व अन्य साहित्य चोरणाऱ्या सहा जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. अटक आरोपींनी चोरीच्या ११ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बुधवारी ही मेगा कार्यवाही करण्यात आली.
एलसीबीनुसार, श्याम उर्फ राजेश भोसले, अंकुश पर्वतसिंग पवार, आकाश पर्वतसिंग पवार, लोकेश जरतारी पवार (चौघेही रा. तरोडा, चांदूर रेल्वे), सागर रतन पवार (रा. शिवाजीनगर, चांदूर रेल्वे) व कांजा कमराज भोसले (रा. काळागोटा, तिवसा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरांची नावे आहेत.
गेल्या काही महिन्यांत ग्रामीण भागामध्ये शेतामधील साहित्य चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी चोरांना अटक करून त्या घटनांना आळा घालण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते. तपासात अशा गुन्ह्यात श्याम उर्फ राजेश भोसले याचा हात असून त्याने साथीदारांसोबत हे गुन्हे केल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने श्याम उर्फ राजेश भोसले व त्याचा साथीदार लोकेश पवार यांना अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी ते गुन्हे आकाश पवार, सागर पवार, कांजा भोसले व अंकुश पवार यांच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्यानुसार या चौघांनाही अटक करण्यात आली.