अमरावती: जिल्हा ग्रामीण पोलिस दलामध्ये १९ जूनपासून पोलिस भरती प्रक्रियेस सुरुवात झाली असून, त्या मालिकेत २१ जून रोजी सकाळी मैदानी चाचणीकरिता १२०० उमेदवारांना बोलाविण्यात आले होते; परंतु गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे मैदान पूर्णत: ओले झाले. त्यामुळे त्यावर २१ जून रोजी बोलावलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेता आली नाही. ज्या उमेदवारांची २१ जून रोजी मैदानी चाचणी होती त्यांची ती चाचणी आता १६ जुलै रोजी होणार आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडून ही माहिती देण्यात आली. पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकामुळे भरती रद्द झाल्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
ग्रामीण पोलिसांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया २२ जून व त्यापुढे दररोज नियमितपणे सुरू राहणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी २२ जूनसह व त्यानंतर मैदानी चाचणी असेपर्यंत दररोज त्यांना नेमून दिलेल्या दिनांकास पहाटे ४:३० वाजता माल टेकडीच्या बाजूला असलेल्या जोग स्टेडियम येथे हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसामुळे मैदान ओले झाल्याने केवळ शुक्रवारची भरती प्रक्रिया रद्द झाली आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द झालेली नाही. त्यामुळे कृपया उमेदवारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे.